नाशिक मिरर वृत्तसेवा :
पारंपरिक पद्धतीने आनंदीपणे जीवन जगण्यासाठी जी कलात्मक अभिव्यक्ती केली जाते, तीच खरी लोककला असल्याचे सुप्रसिद्ध सिने–नाट्य अभिनेत्री आणि बालरंगभूमी मध्यवर्ती शाखेच्या अध्यक्षा नीलम शिर्के–सामंत यांनी सांगितले. महाराष्ट्रातील विविध अठरा पगड जातींना एकत्र ठेवणाऱ्या लोककलांचा हा उत्सव म्हणजे समाजाला जोडणारा सांस्कृतिक सेतू असल्याचे त्यांनी नमूद केले. बालरंगभूमीने आयोजित केलेल्या या महोत्सवाद्वारे कलावंत आणि आयोजकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा विशेष सोहळा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बालरंगभूमी मुंबई शाखेच्या राज्यस्तरीय उपक्रमांतर्गत नाशिक शाखेच्या वतीने “जल्लोष लोककलेचा” या महोत्सवाचे आयोजन कालिदास कलामंदिर येथे करण्यात आले. जिल्ह्यातील २० हून अधिक शाळांमधून आणि संस्थांमधून तब्बल ५०० पेक्षा अधिक बालकलावंतांनी चमकदार उपस्थिती लावली. दीपप्रज्वलन आणि नटराज पूजा करून महोत्सवाची सुरुवात झाली.
या वेळी व्यासपीठावर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नाशिक शाखाध्यक्ष रविंद्र कदम, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, बालरंगभूमी नाशिक शाखेचे प्रभारी अध्यक्ष आनंद जाधव आणि प्रभारी प्रमुख कार्यवाह कृतार्थ कंसारा उपस्थित होते.
बालकलाकारांशी संवाद साधताना नीलम शिर्के–सामंत म्हणाल्या, “तुमच्याकडे अशी गोष्ट आहे जी मोठ्यांकडे नाही — ती म्हणजे बालपण! ते मनमुराद जगा. परंपरा शिका, पारंपरिक खेळ खेळा आणि बालरंगभूमीच्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हा. तुम्हीच बालरंगभूमीचे खरे चालक आहात.”
१९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता सुरू झालेल्या या महोत्सवात विविध पारंपरिक लोकगीतांवर आधारित नेत्रदीपक लोकनृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान बालरंगभूमी नाशिकतर्फे नीलम शिर्के–सामंत यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यापूर्वी प्रास्ताविक करताना आनंद जाधव यांनी बालरंगभूमीच्या वाढत्या बळामध्ये नीलम शिर्के यांच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. सुनील ढगे यांनी दिलेल्या पाठबळाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, तर रविंद्र कदम यांनी विविध लोककलांच्या परंपरांचा परिचय करून दिला. आभार प्रदर्शन कृतार्थ कंसारा यांनी केले. संपूर्ण महोत्सवाचे सुत्रसंचालन केतकी कुलकर्णी यांनी केले.
महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रा. रविंद्र कदम, कार्यवाह सुनील ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष जयदीप पवार, विश्वंभर परेवाल, ओम देशमुख आणि रोहित जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
आगामी उपक्रमांची घोषणा
बालरंगभूमीतर्फे लवकरच दिव्यांग महोत्सव तसेच उन्हाळी सुटीत सर्जनशील निवासी शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या उपक्रमांमध्ये अधिकाधिक मुलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नीलम शिर्के–सामंत यांनी केले.


