नाशिकच्या सातपूर कॉलनीतील कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर; बीडजवळ अपघातात वडील आणि पुतण्याचा दुर्देवी अंत

नाशिक मिरर वृत्तसेवा : नाशिक येथील सातपूर कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. आपल्या लेकीसाठी नवरदेव आणि सासरचे घर पाहण्यासाठी बीड येथे निघालेल्या एकाच कुटुंबातील वडील आणि पुतण्याचा बीडजवळ झालेल्या भीषण अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. या अपघातामुळे सातपूर परिसरात शोककळा पसरली आहे.

काय आहे नेमकी घटना?

​सातपूर कॉलनी येथील रहिवासी फसाळे कुटुंबामध्ये मुलीच्या लग्नाची बोलणी सुरू होती. बीड येथील एका तरुणासोबत सोयरीक जमली होती आणि मुलाकडील मंडळींनी मुलीला पाहून पसंतही केले होते. या रितीनुसार, दि. १४ नोव्हेंबर रोजी मुलीचे वडील सखाराम रामचंद्र फसाळे (वय ५५, रा. सातपूर कॉलनी), त्यांचा मुलगा रविकांत सखाराम फसाळे, आणि पुतण्या विशाल देवीदास फसाळे (वय ४०, रा. सातपूर कॉलनी) हे नवरदेवाचे घर आणि परिसर पाहण्यासाठी टाटा मॅजिक वाहनातून बीडकडे निघाले होते.

​शुक्रवारी (१४ नोव्हेंबर) दुपारी २ वाजेच्या सुमारास ते बीड येथील नियोजित ठिकाणापासून अवघे १३ किलोमीटर दूर असताना, त्यांच्या वाहनाला एका मालवाहतूक टेम्पोने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, सखाराम फसाळे आणि विशाल फसाळे हे जबर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच या दोघांचाही दुर्देवी मृत्यू झाला. अपघातात मुलगा रविकांत फसाळे आणि वाहनचालक किरकोळ जखमी झाले आहेत.

माहिती मिळताच पत्रकाराच्या हाकेला ‘छावा’ची धाव

अपघातानंतर वडील आणि चुलत भावाचा मृत्यू झाल्याने रविकांत फसाळे हे पूर्णपणे हादरून गेले होते. बीडसारख्या अनोळखी ठिकाणी मृतदेह नाशिकच्या सातपूर येथे आणण्यासाठी वाहन मिळत नसल्याने ते हवालदिल झाले होते. त्यांनी तातडीने सोशल माध्यमावरून नाशिकचे पत्रकार सागर आनप यांच्याशी संपर्क साधून मदतीची विनंती केली.

​पत्रकार सागर आनप यांनी लागलीच या घटनेची गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी त्वरित छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांना फोन करून मदत करण्यास सांगितले. गायकर यांनीही तात्काळ प्रतिसाद देत बीड येथील संघटनेचे पदाधिकारी गंगाधर काळकुटे आणि सूरज जायभावे यांना मदतीसाठी सूचना दिल्या.

​या पदाधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत तात्काळ ॲम्बुलन्सची व्यवस्था केली आणि मृतदेह नाशिकच्या सातपूरकडे रवाना करण्याची व्यवस्था केली. छावा क्रांतिवीर सेनेच्या या तात्काळ सेवाकार्यामुळे रविकांत फसाळे यांनी कृतज्ञता व्यक्त करत सर्वांचे आभार मानले.

​बीड पोलिसांनी मालवाहतूक टेम्पोच्या चालकाला ताब्यात घेतले असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बीड पोलीस करत आहेत. या अपघातामुळे फसाळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बातम्या

Don`t copy text!