नाशिक मिरर वृत्तसेवा :
नाशिक शहरातील इंदिरानगर परिसर शनिवारी पहाटे एका अतिशय धक्कादायक आणि हृदयद्रावक घटनेने हादरून गेला. इंदिरानगर येथील वनसंपदा सोसायटीच्या उद्यानाजवळ वैष्णवी अनिल आवारे (वय २०) या तरुणीची तिच्याच माजी प्रियकराने धारदार चाकूने गळ्यावर वार करून निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर काही तासांतच साहिल अशोक लाव्हारे (वय २३, रा. यवतमाळ) या संशयित आरोपीने इंदिरानगर येथील जॉगिंग ट्रॅक परिसरातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
या दुहेरी घटनेमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली असून प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादाचे हे भीषण रूप असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
प्रेमसंबंध, लिव्ह-इन आणि नंतर वाढलेला वाद
मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी ही मूळची अमरावती जिल्ह्यातील असून शिक्षणासाठी नाशिकमध्ये इंदिरानगर भागात पेईंग गेस्ट (PG) म्हणून राहत होती. तिचे आणि साहिलचे पूर्वी प्रेमसंबंध होते. दोघे काही काळ लिव्ह-इन रिलेशनशिपमध्येही राहत असल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र काही कारणांमुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. दरम्यान, वैष्णवीचे दुसऱ्या एका तरुणाशी लग्न ठरल्याची माहिती साहिलला मिळाली. याच कारणावरून तो संतप्त होता आणि त्यातूनच ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
उद्यानात अचानक हल्ला
शुक्रवारी (१७ जुलै) रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास वैष्णवी तिच्या मैत्रिणीसोबत वनसंपदा सोसायटीच्या उद्यानात बसली होती. त्याचवेळी साहिल तेथे पोहोचला. त्याने वैष्णवीला सोबत येण्याचा आग्रह केला. मात्र तिने स्पष्ट नकार दिला.
नकार मिळताच संतापाच्या भरात साहिलने खिशातून धारदार चाकू काढला आणि वैष्णवीच्या गळ्यावर सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. गंभीर जखमी झालेल्या वैष्णवीचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
होणाऱ्या पतीने फोनवर ऐकला थरार
घटनेच्या वेळी वैष्णवीचा तिच्या होणाऱ्या पतीसोबत मोबाईलवर संवाद सुरू होता. त्याचदरम्यान साहिल आणि वैष्णवी यांच्यातील वाद तसेच हल्ल्याचा थरार फोनवर ऐकू आल्याची माहिती समोर आली आहे.
हत्येनंतर साहिलने वैष्णवीचा मोबाईल घेत तिच्या होणाऱ्या पतीशी संवाद साधत, “वैशूला आज संपवलं,” असे सांगितल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे.
आरोपीचा काही तासांतच शेवट
घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्यासह गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आरोपीचा शोध सुरू असतानाच शनिवारी (१८ जुलै) पहाटे ३ ते ३.३० वाजण्याच्या सुमारास इंदिरानगर येथील जॉगिंग ट्रॅकजवळील झाडाला साहिलचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.यामुळे हत्या केल्यानंतर आरोपीने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांचा तपास सुरू
पोलिसांनी घटनास्थळावरून हत्येसाठी वापरलेला धारदार चाकू जप्त केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले आहे. वैष्णवीच्या होणाऱ्या पतीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून इंदिरानगर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
शहरात हळहळ, तरुणांमध्ये संताप
या घटनेमुळे नाशिक शहरात शोककळा पसरली असून तरुणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रेमसंबंध संपल्यानंतर सूडबुद्धीने हिंसक मार्ग स्वीकारण्याच्या वाढत्या घटनांबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी अशा मानसिकतेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
