प्रयोगशील व कौशल्याधिष्टीत उपक्रमांचा सन्मान
नाशिक मिरर वृत्तसेवा :सागर आनप शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणून त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच कौशल्याधिष्ठित उपक्रमांची जोड देत रोजगाराभिमुख शिक्षणाची नवी वाट दाखविणाऱ्या सातपूरच्या प्रयोगशील व उपक्रमशील शिक्षक योगेश सूर्यवंशी यांना नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाचा या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
सातपूर कॉलनी येथील जिजामाता मनपा माध्यमिक विद्यालयात कार्यरत असलेले प्रयोगशील व उपक्रमशील शिक्षक योगेश महारु सूर्यवंशी यांनी शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात अन्याय बरोबरच शिष्यवृत्ती व एन एम एम एस परीक्षेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत यशाची परंपरा राखली आहे. मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना कोडींगच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देत विद्यार्थ्यांनी अनेक राज्य व जिल्हास्तरीय हॅकेथॉन स्पर्धेत व कोडिंग प्रकल्प स्पर्धेत पारितोषिके प्राप्त केली आहेत. महिला सक्षमीकरणावर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ॲपची निर्मिती ही त्यांनी केली होती. त्यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण कार्याची दखल घेत नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचा यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून लवकरच या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
प्रतिकूल परिस्थितीत शिकणाऱ्या सातपूर परिसरातील कामगार वस्तीतील विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमात मिळवलेल्या यशामुळेच हा पुरस्कार मला प्राप्त झाला आहे. यानिमित्ताने सातपूरच्या जिजामाता शाळेचा हा एक प्रकारे सन्मान असून मी हा पुरस्कार माझ्या विद्यार्थ्यांना समर्पित करतो.-योगेश सूर्यवंशी, शिक्षक, नाशिक मनपा
