सातपूर नाशिक मिरर वृत्तसेवा : सातपूर परिसरातील श्रमिकनगरमधील कडेपठार चौक व विश्वकर्मा मंदिर परिसरात पुन्हा एकदा तोडफोडीचा प्रकार घडला असून, २३ मे रोजी पहाटे २ ते ३ वाजेच्या सुमारास तीन अज्ञात टवाळखोरांनी सात वाहनांची तोडफोड करून गंभीर नुकसान केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

तोडफोडीमध्ये नुकसान झालेली वाहने:

या गुन्ह्यात खालील वाहनांचे नुकसान करण्यात आले आहे.

अनिल राजबशी यांची एमएच ०१ एआर ६२७९,

सागर पाटील यांची एमएच १५ ईजी ७४८५,

भाऊसाहेब आहिरे यांची एमएच १५ सिटी ६३२२,

लक्ष्मी साळवे यांची एमएच ०२ बीझेड ३६४७,

श्री. पांचाळ यांची एमएच ०२ एक्यू १०४०,

विकी कांबळे यांची एमएच ०१ सिटी ०२९६,

दिनेश वाघ यांची एमएच ०३ के ८७०२,

या सर्व वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या असून काहींचे बाह्य भागही तोडण्यात आले आहेत.

पोलिसांची कारवाई अपुरी, नागरिकांमध्ये रोष.

सातपूर पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून, दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. परंतु नागरिकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार अशा घटना घडत असूनही पोलिसांची गस्त अपुरी असून टवाळखोरांवर वचक राहिलेला नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

घटनेनंतर आमदार सिमा हिरे,नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील, सामाजिक कार्यकर्ते अमोल पाटील, दिनकर कांडेकर, कल्पेश कांडेकर आदींनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी घाबरून न जाता पोलिसात तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले व अशा अन्यायकारक घटनांविरोधात ठामपणे उभे राहण्याचे आव्हान केले.

नागरिकांचा कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह.

श्रमिकनगर व कडेपठार परिसरात याआधीही अशा घटनांचा अनुभव नागरिकांना आहे. काही भागांत सीसीटीव्ही नसल्यामुळे गुन्हेगारांचे धाडस वाढले आहे. रात्रीच्या वेळी पोलिस गस्त अपुरी असून नागरिक स्वतःच्या सुरक्षेसाठी चिंतीत आहेत.

नागरिकांची मागणी ठोस उपाययोजना करा.

घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मागण्या केल्या आहेत:

परिसरात अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.

रात्रीची पोलीस गस्त नियमित व प्रभावी करावी.

टोळक्यांवर कठोर कारवाई केली जावी.

पोलिसांनी गस्त वाढवून गुन्हेगारावर कठोर कारवाई करावी.

अशी मागणी केली आहे.

कडेपठार चौकात घडलेली ही तोडफोड फक्त मालमत्तेचे नुकसान नाही, तर संपूर्ण भागाच्या सुरक्षिततेवरचा घाला आहे. पोलिस प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन कठोर पावले उचलली नाहीत, तर उद्या आणखी गंभीर घटना घडू शकतात, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

बातम्या

Don`t copy text!