नाशिक मिरर वृत्तसेवा : सातपूरमधील आनंदवली परिसरात गेल्या काही दिवसांपासून गंभीर स्वरूपाची ड्रेनेज समस्या निर्माण झाली आहे. श्री गुरुजी रुग्णालय रोड, काळेनगर-२, लक्ष्मीनारायण अपार्टमेंट, मंडलिकनगर, मंगलम सोसायटी, अस्मिता हाइट्स आदी भागात ड्रेनेजचे सांडपाणी थेट रस्त्यावर, प्लॉटमध्ये आणि शेतात साचले आहे.

 

        या पाण्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.सांडपाण्यामुळे नागरिकांना नाकातोंड झाकून प्रवास करावा लागत आहे. दुर्गंधीमुळे घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. लहान मुले, वृद्ध व रुग्ण यांना यामुळे अधिक त्रास होत आहे. या घाणीमुळे परिसरात मच्छरांचा प्रचंड उपद्रव वाढला असून, आरोग्याच्या दृष्टीने मोठा धोका निर्माण झाला आहे.

ड्रेनेजचे पाणी थेट शेतात व रस्त्यावर

या भागातील ड्रेनेज व्यवस्था कोलमडली असून पाण्याचा निचरा न झाल्यामुळे ते थेट शेतात व प्लॉटमध्ये जमा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता आहे.

प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

नागरिकांनी नाशिक महानगरपालिकेकडे वेळोवेळी तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. “प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळतात, प्रत्यक्षात काहीच होत नाही,” अशी भावना रहिवाशांनी व्यक्त केली आहे.आरोग्याचा गंभीर प्रश्न

या घाण पाण्यामुळे मलेरिया, डेंग्यू, त्वचारोग यांसारखे आजार पसरू शकतात. पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावर ही परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची शक्यता आहे.

या समस्येवर तातडीने उपाययोजना करावी, ड्रेनेज व्यवस्था दुरुस्त करून परिसराची साफसफाई करावी, तसेच आरोग्य विभागाने औषध फवारणी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

 

 

 आनंदवली परिसरात सध्या निर्माण झालेली ही आरोग्यविषयक समस्या अत्यंत गंभीर असून, प्रशासनाने तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे. अन्यथा, नागरिकांना आंदोलन करावे लागेल. -रवींद्र काळे, स्थानिक नागरिक

बातम्या

Don`t copy text!