नाशिक मिरर वृत्तसेवा :
सातपूर परिसरात धोकादायक ठरू शकणाऱ्या झाडांच्या फांद्यांची तातडीने छाटणी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना महिला उपमहानगरप्रमुख रोहिणी देवरे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवरे यांनी महापालिकेच्या उद्यान विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. विशेषतः सातपूर परिसरातील सातपूर कॉलनी, अशोक नगर, सावरकर नगर, राज्य कर्मचारी वसाहत, वास्तु नगर, विश्वास नगर, राधाकृष्ण नगर या भागांमध्ये अनेक जुनी व प्रचंड विस्तार असलेली झाडे आहेत, ज्यांच्या फांद्या वाहनांवर किंवा विजेच्या तारांवर कोसळण्याचा धोका आहे.
“पावसाळा सुरू झाल्यावर किंवा अवकाळी पावसात वारंवार झाडे उन्मळून पडताना दिसतात. यंदाही सातपूरमध्ये हेच चित्र दिसून आले असून काही नागरिक जखमी झाले आहेत, तर काहींना आपला जीव गमवावा लागला आहे,” असे देवरे यांनी सांगितले.
अशा घटनांमुळे वाहतूक खोळंबते, वीजपुरवठा खंडित होतो आणि वाहनांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे महापालिकेने सातपूर भागातील धोकादायक झाडांची फांद्यांची छाटणी करावी, अशी मागणी रोहिणी देवरे यांनी केली आहे.
