ओझर : नाशिक मिरर वृत्तसेवा गडचिरोली येथे सर्पदंशामुळे तीन निष्पाप आदिवासी बालिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ ओझर मिग परिसरात शांततापूर्ण कॅन्डल रॅली काढण्यात आली. डॉ. राममनोहर लोहिया नगर, महादेव मठ, गाडेकरवाडी आणि पंचशील नगर येथील नागरिक व बांधवांनी या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होत मृत बालिकांना श्रद्धांजली अर्पण केली.

 

आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि मूलभूत सुविधांबाबत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आश्रमशाळांमध्ये निकृष्ट दर्जाचे अथवा विषबाधा होण्याची शक्यता असलेले अन्न, विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचा अभाव, अपुऱ्या शैक्षणिक सुविधा, बेड व चादरींची कमतरता, तसेच वसतिगृहांची दुरवस्था याबाबत संताप व्यक्त करण्यात आला.

 

आश्रमशाळांमध्ये स्थायी शिक्षकांची उपलब्धता, विद्यार्थ्यांना पुरेशा आरोग्य सुविधा आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची मागणी करण्यात आली. केवळ कागदोपत्री नियम न करता आश्रमशाळांसाठी स्वतंत्र व प्रभावी नियमांची अंमलबजावणी करावी, अशी मागणीही नागरिकांनी केली.

 

प्रमुख मागण्या

 

– मृत बालिकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी.

– प्रत्येक मृत बालिकेच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी देण्यात यावी.

– आश्रमशाळांसाठी स्वतंत्र नियम तयार करून त्यांची काटेकोर अंमलबजावणी करावी.

– आश्रमशाळांची ऑनलाइन देखरेख व्यवस्था निर्माण करावी, जेणेकरून पालकांना आपल्या मुलांची उपस्थिती व स्थिती मोबाईलवरून पाहता येईल.

– आश्रमशाळांमध्ये सेंटर किचनची पद्धत बंद करून विद्यार्थ्यांना दर्जेदार व सुरक्षित भोजन उपलब्ध करून द्यावे.

– विद्यार्थ्यांसाठी नियमित आरोग्य तपासणी व तत्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

– विद्यार्थ्यांना राहण्यासाठी आवश्यक बेड, चादरी, शैक्षणिक साहित्य आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

 

या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी रॅलीदरम्यान करण्यात आली.

 

रॅलीचे नियोजन डॉ. राममनोहर लोहिया नगर परिसरातील नागरिकांनी केले होते. यावेळी ओझर ग्रामस्थांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. हातात कॅन्डल घेऊन नागरिकांनी मृत बालिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत “आम्हाला न्याय हवा” अशी मागणी केली.

Don`t copy text!