क्विक हील फाऊंडेशन व डॉ. डी. वाय. पाटील एसीएस कॉलेज, पिंपरीच्या पुढाकारातून जनजागृती सत्र उत्साहात

खराडी, पुणे | नाशिक मिरर वृत्तसेवा डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि त्यासोबत वाढणारे सायबर गुन्हे लक्षात घेता विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल अॅड ज्युनिअर कॉलेज, खराडी येथे सायबर सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. क्विक हील फाऊंडेशन (Quick Heal Foundation) आणि डॉ. डी. वाय. पाटील आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, पिंपरी यांच्या सहकार्याने हे सत्र उत्साहात पार पडले.

 

Quick Heal Foundation Cyber Warrior Club च्या ‘Cyber Shiksha for Cyber Suraksha’ या अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार, ऑनलाइन फसवणुकीचे धोके आणि डिजिटल माध्यमांचा सुरक्षितपणे वापर करण्याबाबत मार्गदर्शन करणे हा होता.

 

फिशिंग, OTP आणि ऑनलाइन फसवणुकीबाबत मार्गदर्शन

या सत्रात Cyber Warriors श्रेयसी खांदवे आणि ज्ञानेश्वर अगलावे यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. फिशिंग, बनावट लिंक, OTP व पासवर्डची सुरक्षितता, सोशल मीडिया गोपनीयता, ऑनलाइन फसवणूक, बनावट प्रोफाईल व संदेश, सायबर बुलिंग तसेच सुरक्षित डिजिटल व्यवहार यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या लिंकवर क्लिक करण्यापूर्वी काळजी घेणे, कोणत्याही व्यक्तीस OTP, पासवर्ड किंवा वैयक्तिक माहिती शेअर न करणे, मजबूत पासवर्डचा वापर करणे आणि सोशल मीडिया अकाउंटच्या Privacy Settings वेळोवेळी तपासणे याबाबत विद्यार्थ्यांना व्यावहारिक सूचना देण्यात आल्या.

 

तसेच संशयास्पद संदेश, बनावट प्रोफाईल किंवा ऑनलाइन व्यवहार आढळल्यास तत्काळ सावध होणे आणि कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले.

 

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या जनजागृती सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दैनंदिन जीवनात मोबाईल, सोशल मीडिया, ऑनलाइन पेमेंट आणि इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने सायबर सुरक्षेचे महत्त्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून समजावून सांगण्यात आले.

 

मान्यवरांचे सहकार्य व मार्गदर्शन

या उपक्रमासाठी संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल अॅड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सोमनाथ बाघमारे यांचे सहकार्य लाभले. तसेच Chairperson अनुपम काटकर, डॉ. डी. वाय. पाटील आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. रणजित पाटील आणि कॉलेज को-ऑर्डिनेटर सत्यबान कुजीर यांचे मार्गदर्शन लाभले.

 

‘सुरक्षित नागरिक, सुरक्षित डिजिटल समाज’चा संदेश

डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी केवळ तंत्रज्ञानाचा वापर करणारे नव्हे, तर सजग, जबाबदार आणि सुरक्षित डिजिटल नागरिक बनणे आवश्यक आहे. या उद्देशाने घेण्यात आलेल्या जनजागृती सत्रातून विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे महत्त्व पटवून देण्यात आले.

 

सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे तसेच कुटुंबीयांचे संरक्षण करण्यासाठी डिजिटल साक्षरता आणि जागरूकता वाढविणे गरजेचे असून, ‘सुरक्षित नागरिक, सुरक्षित डिजिटल समाज’ या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण पाऊल ठरला.

Don`t copy text!