शिवाजीनगर ,श्रमिकनगरला जयंती उत्सहात साजरी
नाशिक मिरर:
भारतीय पुराणाने नारीशक्तीला दुर्गेचं स्थान दिलं असलं तरी अज्ञानाच्या साखळदंडात जखडून ठेवलेल्या या दुर्गेला जोखडातून मुक्त करणारा महापुरुष खरा क्रांतिसूर्य आहे, याच क्रांती सूर्याने छत्रपतींना कुळवाडी भुषण संबोधून बळी राज्याविषयी असलेली कृतज्ञता व्यक्त केली. ते महात्मा फुले यांचे विचार समाजात रुजवून सामाजिक स्वातंत्र्याची दुसरी लढाई पुढे घेऊन जाणे हीच खरी या क्रांती सूर्याला श्रद्धांजली ठरेल. अशा शब्दात छावा क्रांती वीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी म. फुले यांना अभीवादन केले.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीतेचे औचित्य साधून शिवाजी नगर श्रमिक नगर धृवनगर धर्माजी कॉलनी या परिसरातील नागरिकांच्या वतीने शिवसेनेचे संपर्क कार्यालय शिवाजीनगर या ठिकाणी सर्वपक्षीय एकत्र येऊन जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, प्रभागाच्या माजी महिला बालकल्याण सभापती हेमलता कांडेकर ,माजी सभापती सदाशिव दादा माळी, यांच्या हस्ते थोर महापुरुषांचा प्रतिमेला हार पुष्प अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी महापुरुषांना अभिवादन करतांना करण गायकर म्हणाले, स्वातंत्र्य हा केवळ शब्द नाही तर तो एक अनुभव आहे. अशा प्रतीचे खरे खुरे स्वातंत्र्याचे
स्वप्न ज्यांनी बघितले , त्या स्वातंत्र्याचा उगम स्त्री दास्यमुक्तीत आहे याची जाण ज्यांना झाली, त्यातून भारतीय समाज रचनेचा कायापालट करण्याचा ध्यास ज्यांनी हयातभर जगला ते महात्मा ज्योतिबा फुले महान क्रांतिसूर्य आहेत , सामान्य, दुर्लक्षित, उपेक्षित माणसांसाठी लढले म्हणून ते असामान्य ठरले. याच महा आत्म्याने रायगडावर शिवरायांच्या समाधीचा शोध घेऊन, विधीवत पूजा करून ती शिव समाजाला अर्पण केली. शिव जन्मोत्सवाची सवय लावली.
लहुजी वस्ताद साळवे यांचे कडून दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले थॉमस पेन यांच्या ” राईट ऑफ मॅन ” पुस्तकाचा अभ्यास केला 1841 ते 1847 दरम्यान स्कॉटिश मिशन हायस्कूल मधून इंग्रजी भाषेचे शिक्षण घेतले ” वयाच्या अवघ्या 21 वर्षी स्त्रियांच्या जीवनात ज्ञानाची क्रांती घडवून आणण्याचे यशस्वी क्रांतिकारक निर्णय घेतला समस्त हिंदुस्थानातील स्त्रियांना साठी मुलींची पहिली शाळा काढली महिलांसाठी स्वतंत्र शाळा काढणारे, जोतिबा पहिले भारतीय आहेत.1873 साली ज्ञान ची गंगा बहुजन समाजातील शेवटच्या घटका पर्यंत घेऊन जाण्यासाठी “सत्यशोधक समाजाची” स्थापना केली अन्याय अत्याचार ,गुलामगिरी पासून बहुजन समाजाला मुक्ती करणे हे सत्याशोधक समाजाचे ध्येय होते “सर्वसाक्षी जगपती त्याला नको कुणाची मध्यस्थी” हे ब्रीद वाक्य आज ही लागू पडते शेतकऱ्यांचा आसूड ” या पुस्तकातून आमच्या बळीराजाचा आवाज उठवला. समाजातील अनिष्ठ रूढी परंपरा यांच्या विरुद्ध त्यांनी उभारलेला लढा हा खरोखरच जगासाठी एक प्रेरणा आहे. शिक्षणाची गंगा सामान्य अति-सामन्यांच्या पर्यंत पोचवणारा हा भगीरथ .. त्यांचा पिंड एक कृतिशील क्रांतिकारकाचा होता ज्याने केवळ आणि केवळ सत्याची कास धरून आपल्या या महाराष्ट्राचा वैचारिक, सामाजिक कायापालट केला.शिक्षण आणि समता साठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या क्रांतिकारक क्रांतिसूर्याची वर्षातून एकदा जयंती साजरी करून न थांबता प्रत्येकाने त्यांचे विचार घेऊन समाजाला समर्पित झाले तरच त्यांना अभिवादन झाले असे म्हणता येईल, असे त्यांनी सांगितले.
प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर, शिवसेनेचे प्रमोद जाधव ,बाळा जारे, निवृत्ती पाटील शिंदे, विष्णुपंत घुगे, राष्ट्रवादीचे विभागीय नेते महेश आहेर, सम्राट सिंग, छावा क्रांतिवीर सेनेचे युवा प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे, किरण बोरसे, प्रियंका गायकर, मनीषा गांगुर्डे, ज्ञानेश्वर महाजन, वैभव दळवी, गणेश वाघचौरे, मदन देव उपस्थित होते. शिवसेनेच्या सामाजिक कार्यकर्त्या सविता करण गायकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद जाधव यांनी केले तर आभार दिनकर कांडेकर यांनी मानले.
