महापालिका शाळेतील अभिनव शैक्षणिक प्रयोगांची देशपातळीवर दखल; ५ सप्टेंबरला राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान
नाशिक मिरर वृत्तसेवा :महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणाच्या पलीकडचे जग दाखवून त्यांच्यात वाचन, तंत्रज्ञान, संविधान आणि जागतिक शिक्षणाची गोडी निर्माण करणाऱ्या नाशिकच्या उपक्रमशील शिक्षिका कुंदा जयवंत बच्छाव यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ साठी निवड झाली आहे.
कुंदा बच्छाव या नाशिक महानगरपालिकेच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यामंदिर, आनंदवली येथे कार्यरत आहेत. त्यांच्या अभिनव शैक्षणिक प्रयोगांची केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने दखल घेतली आहे. ५ सप्टेंबर २०२६ रोजी शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
भिंती झाल्या ‘ज्ञानभिंती’
‘मिशन मोबाईल-फ्री’ उपक्रमांतर्गत बच्छाव यांनी गावातील ३० हून अधिक भिंतींचे ज्ञानभिंतींमध्ये रूपांतर केले. विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर जाऊन वाचनाकडे वळावे, यासाठी मंदिरात तब्बल २ हजार पुस्तकांचे सार्वजनिक ग्रंथालय सुरू करण्यात आले.
खेळातून संविधानाचे शिक्षण
विद्यार्थ्यांना लोकशाही, मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये सहज समजावीत यासाठी त्यांनी ‘संविधान सापशिडी’ हा अभिनव खेळ विकसित केला. खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संविधानाची ओळख करून देण्याचा हा प्रयोग विशेष ठरला.
‘तरंग वाचनालय’ ठरले आकर्षण
पुस्तके केवळ कपाटात बंद न ठेवता विद्यार्थ्यांच्या हातात सहज उपलब्ध व्हावीत, यासाठी ‘तरंग वाचनालय’ ही संकल्पना राबविण्यात आली. शाळेच्या भिंती, मैदान आणि दोऱ्यांवर पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना आवडीचे पुस्तक सहज घेऊन वाचता येऊ लागले.
विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना शिकवले
अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘निपुण कोपरा’ तसेच एकमेकांना शिकविण्यासाठी ‘दत्तक मित्र-मैत्रीण’ उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमाची राज्य शासनानेही दखल घेत पुरस्काराने गौरव केला आहे.
अमेरिकेतील विद्यार्थ्यांशी थेट संवाद
**’ग्लोबल ई-ट्विनिंग’**च्या माध्यमातून अमेरिकेतील शाळांमधील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्याची संधी नाशिक महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मिळाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला.
रोबोटिक्स, 3D प्रिंटिंगचे धडे
लोकसहभागातून शाळेत Skill Lab उभारण्यात आली असून, येथे विद्यार्थ्यांना रोबोटिक्स आणि 3D प्रिंटिंग यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाते. पारंपरिक शिक्षणासोबत कौशल्याधारित शिक्षणावरही त्यांनी भर दिला आहे.
१५० हून अधिक मुलींच्या शिक्षणासाठी योगदान
वंचित घटकातील १५० हून अधिक मुलींना शिक्षणासाठी मदत करत त्यांनी त्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न केले. बालविवाह रोखण्यासाठीही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
कुंदा बच्छाव यांच्या या विविध उपक्रमांमुळे आनंदवली येथील महापालिका शाळेचा शैक्षणिक चेहरामोहरा बदलला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने नवनवीन प्रयोग करणाऱ्या बच्छाव स्वतःला ‘श्रीमंत शिक्षिका’ असे संबोधतात. विद्यार्थ्यांचे यश आणि त्यांचे उज्ज्वल भविष्य हीच आपली खरी संपत्ती असल्याचे त्यांच्या कार्यातून दिसून येते.
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ साठी देशभरातून निवड झालेल्या शिक्षकांमध्ये महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश आहे. त्यात नाशिकच्या कुंदा बच्छाव यांना मिळालेला बहुमान हा नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी निश्चितच अभिमानाचा क्षण ठरला आहे.
— नाशिक मिरर

