पोलीस दोन तासाने घटनास्थळी दाखल ;नागरिक संतप्त
नाशिक मिरर वृत्तसेवा :
येथील राधाकृष्णनगर मधील बोलकर व्हली पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर दि. १सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास हातगाडी भाजीविक्री करणाऱ्या युवकांला कोणतेही कारण नसताना परिसरातील एका विकृत मनस्थितीच्या इसमाने जबरदस्त मारहाण करून पळून गेला.
परिसरातील नागरिक व महिलांनी घटनास्थळी धाव सदर युवकाला खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. १ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास राधाकृष्णनगर मध्ये विकी ताटे वय २८ वर्ष रा. राधाकृष्णनगर हा युवक नेहमीप्रमाणे उदरनिर्वाह साठी आपल्या हातगाडीवर भाजी विक्री करत असताना परिसरातील एका विकृत मनस्थितीच्या व्यक्ती ने कारण नसताना कुरापत करून जबरदस्त मारहाण केली. व पळून गेला.
यावर परिसरातील महिला व सामाजिक कार्यकर्ते इंद्रभान सांगळे यांनी धाव घेऊन त्यास हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले. घटनेबाबत तक्रार देण्यासाठी राधाकृष्ण नगरातील नागरिकांनी सामूहिक रित्या रा. ९ वा बोलकर व्हॅली पोलीस चौकीत तक्रार करण्यासाठी गेले. परंतु पोलीस चौकी बंद होती.त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करीत, पोलीस चौकी बाहेर ठिय्या आंदोलन करत पोलीस चौकी पूर्णवेळ सूरू करा अन्यथा बंद करा अशी मागणी केली. यावर इंद्रभान सांगळे यांनी सातपूर पोलीस स्टेशन मध्ये संपर्क केला असता तब्बल दोन तासाने पोलीस अधिकारी व कर्मचारी पोलीस चौकीवर आले. व घटनेची माहिती घेतली. पोलीस अधिकारी यांनी महिला व नागरिकांची समजूत काढत सबंधित गन्हेगारा विरोधात लेखी तक्रार देण्यास सांगून गन्हेगारावर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले.
पोलीस चौकीचा वापर केवळ रातपाळीत झोपण्यासाठी का?राधाकृष्णनगर, विश्वासनगर, पवार संकुल, श्रमिकनगर, गंगासागर नगर परिसरात मोठ्या प्रमाणात टवाळखोर व गन्हेगारी प्रवर्तीचे टोळके नागरिकांना त्रास देत असल्याने राधाकृष्णनगर मध्ये बांधकाम व्यवसायिक गणेश बोलकर यांनी स्वखर्चाने स्वजागेवर बोलकर व्हॅली पोलीस चौकी बांधून दिली. सुरुवातीचे दोन वर्ष पोलीस चौकी पूर्णवेळ सुरु होती. परंतु सद्या पोलीस चौकी चा वापर केवळ रात्र पाळी चे पोलीस कर्मचारी झोपण्यासाठी करीत असल्याचे आरोप नागरिकांनी केले आहेत.सदर पोलीस चौकीत कोणत्या प्रकारचे गुन्हे नोंद घेतली जात नाही. नोंद करण्यासाठी पोलीस ठाण्यात पाठवले जाते. पोलीस चौकी आवरातच टवाळखोर मुलांचा गराडा दिसून येतो. चौकीच्या काचा देखील फोडल्या आहेत. ढेरेदार वाढलेल्या झाडाच्या फाद्या मुळे चौकी झाकळून गेली आहे.
दररोज प्रमाणे हातगाडीवर भाजी विक्री करत होतो. परिसरातील एका टवाळखोर इसमाने माझ्या वर कारण नसताना हल्ला करून मारहाण केली. – विकी ताटे,पिढीत युवक
राधाकृष्णनगर मध्ये टवाळखोराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कारण नसताना भाजीविक्री करणाऱ्या युवकाला मारहाण करण्यात आली. पोलीस चौकी नेहमी बंद असते. ती पूर्ण वेळ सूरू करावी.- इंद्रभान सांगळे, सामाजिक कार्यकर्ते.
पोलीस चौकी बंद राहत असल्याने परिसरात गन्हेगारी वाढली आहे. हाणामारी, महिला ची छेड काढणे घटना मध्ये वाढ झाली आहे. याबाबत पोलीस आयुक्ताना पोलीस चौकी पूर्ण वेळ सुरु राहण्याबाबत निवेदन देणार आहे. -इंदूबाई नागरे, मा. नगरसेविका प्र.क्र.१०
स्वखर्चाने व स्वजागेवर आम्ही बोलकर व्हॅली पोलीस चौकी बांधून नाशिक पोलीस आयुक्तालय सातपूर पोलीस स्टेशनला दिली होती. पूर्णवेळ पोलीस अधिकारी व कर्मचारी देण्याची जबाबदारी पोलीस आयुक्तानी घेतली होती. परंतु सद्यास्थिती पोलीस चौकी बंद असते. याबाबत पोलीस आयुक्ताना भेटणार आहे. -माधुरी बोलकर, मा. नगरसेविका प्र. क्र. १०
