श्रमिकनगर मधील धात्रक चौक मधील घटना
नाशिक मिरर वृत्तसेवा : येथील श्रमिकनगर मध्ये आठ जणांच्या कोयता गँग ने एका तरुणाला कोयता व हॉकी स्टिकच्या साहाय्याने जबरी मारहाण केल्याची घटना घडली आहे.एन घटस्थापनेच्या दिवशी सर्वीकडे उत्साहाचे वातावरण असताना सदर कोयता गँगने दहशत पसरवून नागरिकांना भयभीत करून सातपूर पोलिसांना आव्हान दिले आहे. सदर थरारक घटना सिसिटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवार दि. ३ ऑक्टोबर रोजी घटस्थापना दिवशी सायं ६ वाजेच्या सुमारास श्रमिकनगर येथील राधाकृष्णनगर मधील धात्रक चौका मध्ये एक्टिवा वरून श्रमिकनगरच्या दिशेने जाणाऱ्या तीन युवकांवर पाठीमागून पाठलाग करत येणाऱ्या रिक्षा मधील आठ जणांच्या गँगने हल्ला केला. एक्टिवा वरील दोन जणे जीव वाचवण्यासाठी पळून गेले. परंतु अतुल खरे रा. हिंदी शाळा, श्रमिकनगर या तरुणास आठजणांनी सिनेस्टाईल मध्ये हॉकी स्टिक, स्टम्प व कोयत्याने डोके,पाठ व पायावर जबरी वार केले. वाचवायला येणाऱ्या नागरिकांना कोयते दाखवून घाबरवल्या मुळे कोणीही मध्ये पडण्याची हिंमत केली नाही. सोबत असलेल्या दोघांनी अतुल ला जखमी अवस्थेत खाजगी दवाखान्यात नेले परंतु, हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यास नकार दिल्याने त्यास सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सातपूर पोलीस ठाण्यात सुरु होते.श्रमिकनगर, राधाकृष्णनगर, अशोकनगर, गंगासागर नगर परिसरात अशा घटना नेहमी होत असल्याने नागरिकांनी सातपूर पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. सदर दहशत माजवणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन कठोर कारवाई करून नागरिकांना भयमुक्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते इंद्रभान सांगळे यांनी केली आहे.
