नाशिक मिरर :
श्रमिकनगर येथील सराफ,व्यावसायिकावर हल्ला करणाऱ्या टोळीतील दोघांना पकडण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.टोळी तील अन्य तिघांचा पोलिस शोध घेत आहेत.सोने लुटण्याच्या इराद्याने टोळक्याने सराफावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले होते.
४ सप्टेंबर रोजी श्रमिकनगर परिसरात रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास सराफ व्यावसायिक महेश दिलीप टाक हे दुकान बंद करून घरी जात असताना त्यांच्या डोक्यावर व हातावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करून त्यांच्या गळ्यात अडकवलेली बॅग टोळक्याने पळवली होती. या प्रकारामुळे सराफी व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांच्या आदेशाने गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त संजय बारकुंड व सहायक पोलिस आयुक्त नवलनाथ तांबे यांच्याकडून या प्रकरणाचा समांतर तपास सुरू होता.
गुरुवारी (दि. ९) गुन्हे शाखा युनिट २ चे पोलिस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या पथकातील पोलिस हवालदार राजेंद्र घुमरे यांना मिळालेल्या माहितीवरून पथकातील कर्मचारी संजय सानप,सोमनाथ शार्दूल, संपत सानप, विजय वरंदळ यांनी फाशीचा डोंगर परिसरातील जलशुद्धीकरण केंद्र येथे सापळा रचला होता. मिळालेल्या माहिती नुसार दुपारी २ वाजेच्या सुमारास दोन जण मोपेड गाडी वरून येताना दिसले.दबा धरून बसलेल्या पोलिसांच्या पथकाने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळ काढला.
पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले असता संदीप चिंतामण अहिरे (वय ३३) रा. शिवशक्ती रो हाऊस, गंगासागरनगर व रोहित रामचंद्र भालेराव (वय ३०) रा. हंसकुटी रो हाऊस, हिंदी शाळेजवळ अशी त्यांनी नावे सांगितली. दोघांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी जावेद ऊर्फ साजन अन्सारी, अमजद खान व प्रतीक एकडे या तिघांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून एमएच.१५ एफई ८७१० या क्रमांकाची दुचाकी जप्त केली असून पुढील तपासासाठी आरोपींना सातपूर पोलिसांच्या ताब्यात दिले असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
