मृत व्यक्तीच्या नावाने मतदान ओळखपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक आरोप
बनावट कागदपत्रांच्या जोरावर म्हाडाचे घर बळकावले; राजू बडगुजरसह तिघांविरुद्ध गुन्हा
भूखंड माफियांचे नाशिकमध्ये पुन्हा डोके वर
मृत व्यक्तीचे मतदान कार्ड तयार करून सदनिका हस्तांतराचा धक्कादायक प्रकार
नाशिक मिरर वृत्तसेवा : बनावट कागदपत्रे, खोटी ओळख आणि मृत व्यक्तीच्या नावाचा गैरवापर करून म्हाडाची सदनिका बळकावल्याचा धक्कादायक प्रकार सातपूरमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी संशयित प्रशांत उर्फ राजू बडगुजर, आनंद भट्टड आणि राजेश विश्वकर्मा यांच्याविरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठ दिवसांत राजू बडगुजरविरुद्ध दाखल झालेला हा दुसरा तर आता पर्यत हा तिसरा गुन्हा असल्याने शहरातील भूखंड माफियांचे जाळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी संगनमत करून फिर्यादीच्या मृत वडिलांच्या नावावरील मालमत्तेची बनावट कागदपत्रे तयार केली. एवढेच नव्हे तर मृत व्यक्तीच्या नावाचे मतदान ओळखपत्र तयार करून त्याच्या आधारे म्हाडाची सदनिका हस्तांतरित करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शासकीय यंत्रणांच्या पडताळणी प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, खोटी माहिती, बनावट नोंदी आणि खोट्या दस्तऐवजांच्या आधारे संबंधितांनी शासनाची दिशाभूल करत मालमत्ता बळकावण्याचा कट रचला. तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि त्यांचा वापर करणे यासह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.
दरम्यान, अवघ्या आठ दिवसांपूर्वीच राजू बडगुजर याच्यावर जळगावच्या एका व्यावसायिकाला तब्बल २२ लाख ५७ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप झाला होता. स्वस्तात प्लॉट मिळवून देण्याचे आमिष दाखवत बनावट मालक उभा करणे, खोटे दस्तऐवज तयार करणे आणि विश्वास संपादन करून लाखो रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला होता. त्या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, यापूर्वी आडगाव पोलीस ठाण्यातही त्याच्याविरोधात गुन्हा नोंद आहे.
सातपूर, गंगापूर आणि आडगाव या तीन ठिकाणी समोर आलेल्या प्रकरणांमुळे नाशिकमध्ये सक्रिय असलेल्या कथित प्लॉट माफियांच्या कारवायांबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्ता व्यवहार होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भाऊसाहेब दहिफळे करीत आहेत.
नागरिकांना आवाहन
बोगस प्लॉट किंवा घर खरेदी-विक्री व्यवहारांबाबत कोणालाही माहिती अथवा तक्रार असल्यास त्यांनी सातपूर पोलिसांशी तातडीने संपर्क साधावा. तक्रारदाराची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल
– प्रकाश अहिरे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सातपूर
