पेट्रोलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारताचा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय!
नाशिक मिरर वृत्तसेवा :
नवी दिल्ली येथे ३ जून २०२६ रोजी देशाच्या ऑटोमोबाईल क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकत Hero MotoCorp ने भारतातील पहिल्या फ्लेक्स-फ्युएल (इथेनॉलवर चालणाऱ्या) मोटरसायकल्सचे अधिकृत लॉन्च केले. हा महत्त्वाचा कार्यक्रम केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री Nitin Gadkari आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या हस्ते पार पडला. Hero ने आपल्या सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या Splendor+ Flex Fuel आणि HF Deluxe Flex Fuel या दोन मॉडेल्समध्ये हे नवीन तंत्रज्ञान सादर केले असून, यामुळे भारतात पेट्रोलवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेने मोठी सुरुवात झाली आहे.
या बाईक्सची एक्स-शोरूम किंमत HF Deluxe Flex Fuel साठी ₹72,792 तर Splendor+ Flex Fuel साठी ₹82,810 इतकी ठेवण्यात आली आहे. दोन्ही बाईक्समध्ये 97.2cc सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आले असून हे इंजिन आता पेट्रोलसोबतच E20 ते E85 इथेनॉल मिश्रणावर सहज चालू शकते. या फ्लेक्स-फ्युएल व्हर्जनमध्ये कंपनीने तब्बल 36 महत्त्वाचे तांत्रिक बदल केले आहेत, ज्यामध्ये सुधारित फ्युएल सिस्टम, नवीन फ्युएल पंप, सेकंडरी फिल्टर आणि अपडेटेड ECU मॅपिंगचा समावेश आहे. परफॉर्मन्सच्या बाबतीत या नव्या व्हर्जनमध्ये 7% अधिक पॉवर (8.4 hp) आणि 3% अधिक टॉर्क (8.3 Nm) मिळतो, ज्यामुळे बाईक अधिक स्मूथ आणि कार्यक्षम बनते.
डिझाईनच्या बाबतीत Hero MotoCorp ने या बाईक्सना नवीन Black with Lime Yellow ग्राफिक्स दिले असून डिजिटल-ऍनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमुळे त्यांना आधुनिक आणि आकर्षक लूक मिळाला आहे. या लॉन्चमुळे पर्यावरण आणि अर्थव्यवस्था दोन्ही स्तरांवर मोठा फायदा अपेक्षित आहे कारण इथेनॉल हे ग्रीन फ्युएल असल्याने कार्बन मोनोऑक्साइड उत्सर्जनात तब्बल 77% पर्यंत घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच भारत सध्या मोठ्या प्रमाणात पेट्रोलियम आयात करत असल्याने या तंत्रज्ञानामुळे देशाचे सुमारे ₹1.44 लाख कोटी विदेशी चलन वाचू शकते असा अंदाज आहे, तर दुसरीकडे ऊस आणि धान्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या मागणीत वाढ होऊन शेतकऱ्यांना थेट आर्थिक फायदा मिळणार आहे, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.
ही बाईक्स जुलै 2026 पासून बाजारात उपलब्ध होणार असून सुरुवातीला दिल्ली आणि महाराष्ट्रातील निवडक बाजारपेठांमध्ये त्यांची विक्री सुरू केली जाईल आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशभरात विस्तार केला जाईल. एकूणच, Hero MotoCorp चा हा उपक्रम भारताला पेट्रोलवरील अवलंबित्व कमी करून स्वच्छ आणि हरित इंधनाच्या दिशेने नेणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.


