“गंगापुर पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाची उल्लेखनिय कामगिरी”
नाशिक मिरर :
नाशिक शहर पोलीस आयुक्तांलयातील गंगापूर पोलीस स्टेशनच्या जागृत पोलीस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे चैन स्केचिंग सोनसाखळी,मंगळसूत्र चोरी करणाऱ्या चोराला अटक करण्यात यश आले आहे. व त्याच्याकडून शहरातील विविध पोलीस ठाण्या मध्ये घडलेल्या सोनसाखळी चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे महिलांचे चोरीला गेलेले स्त्री धन परत मिळवून महिलांना अनोखी भेट पोलिसांनी दिली आहे. नाशिक पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत मागील काही वर्षांपासून अनोळखी आरोपी मोटार सायकलने येवून रस्त्याने पायी चालणाऱ्या महिलांचे गळ्यातील सोनसाखळी चोरीचे गुन्हे करत होते. सदर गुन्हयांचे अनुषंगाने दीपक पाण्डेय, पोलीस आयुक्त नाशिक शहर, अमोल तांबे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ- १, दिपाली खन्ना, सहा. पोलीस आयुक्त, विभाग- २, नाशिक शहर यांनी त्याच्या मार्गदर्शनाखाली विविध पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व गुन्हे शोध पथकास सदर सोनसाखळी चोरीचे गुन्हयांतील अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्यासाठी पथक तयार करण्यास सांगितले होते.
चोरांना अटक करण्यास असे केले होते नियोजन :
गंगापुर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाझ शेख यांनी पोलीस ठाणेचा कार्यभार स्विकारले पासुन पोलीस ठाणेचे हद्दीत मागील ०३ वर्षापासुन घडलेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्हयांचे अवलोकन केले असता त्यामध्ये सदर सोनसाखळी चोर हे चोरी करणेसाठी येण्याकरीता व चोरी केल्यानंतर पलायन करणेकरीता गंगापुर पोलीस ठाणे हद्दीतील आसाराम बापु ब्रिज, कटारीया ब्रिज व कृषीनगर जॉगींग ट्रॅक येथील रस्त्यांचा वापर करत असल्याचे त्यांचे निदर्शनास आले. त्यानुसार त्यांनी मागील एक महिन्यापासुन सोनसाखळी चोरांना पकडण्याकरीता सायंकाळी ६ वा. ते ९ वाजेच्या दरम्यान सपोनि प्रविण सुर्यवंशी, पोउनि संजय भिसे व अंमलदारांना साध्या गणवेषात वरील तिनही ठिकाणी मोटार सायकलने गस्त करून सदर ठिकाणी येणाऱ्या संशयित मोटार सायकल स्वारांच्या हालचालींवर लक्ष ठेवुन ताब्यात घेण्यास सांगितले होते.
दिनांक २१ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ८ वाजेच्या दरम्यान गुन्हे शोध पथकाचे पोउनि संजय भिसे, पोलीस नाईक रविंद्र मोहीते, पोना मिलींद परदेशी,पोलीस शिपाई घनश्याम भोये असे ठरलेल्या योजनेप्रमाणे साध्या गणवेषात गस्त करीत असतांना पोना मिलींद परदेशी व घनश्याम भोये यांना आसाराम बापु पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक संशयित मोटार सायकलस्वार रस्त्याने पायी चालणाऱ्या महिलेला पाहुन तिच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरीच्या उद्देशाने रस्त्यावर यु-टर्न मारून उलटया दिशेने जात असतांना दिसला.
यांनी बजावली उल्लेखनीय कामगिरी :
गस्तीवरील गंगापूर पोलीस स्टेशन चे पोलीस कर्मचारी मिलींद परदेशी व घनश्याम भोये यांना संशय आल्याने त्यांनी त्यांचे मोटार सायकलने सदर संशयित इसमाचा पाठलाग केला. परंतु सदर संशयित इसमास त्याचा पाठलाग होत असल्याची चाहुल लागल्याने तो मोटार सायकलने पळुन जात असतांना मिलींद परदेशी व घनश्याम भोये यांनी त्याचे मोटार सायकलला अटकाव करून त्यास शिताफीने ताब्यात घेवुन लागलीच गस्तीवरील पोउनि संजय भिसे व रविंद्र मोहीते यांचे मदतीने त्यास पुढील चौकशीकामी त्याचे ताब्यातील मोटार सायकलसह पोलीस ठाणेस आणले.
आरोपीचे टी-शर्ट वर एकावर एक असे दोन जॅकेट :
त्यानंतर पकडलेल्या संशयित इसम नाव दंगल उर्फ उमेश अशोक पाटील याचेकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाझ शेख, पोउनि संजय भिसे व गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी तपासणी केली असता त्याने टी-शर्ट वर एकावर एक असे दोन जॅकेट परिधान केल्याने सदरचे जॅकेट काढले असता त्याचे पाठीवर एक छोटी बॅग व त्यामध्ये एक मोटार सायकलची नंबरप्लेट व स्कु मिळुन आले. तसेच त्याचेकडे वेगवेगळ्या रंगाचे तीन कापडी मास्क मिळून आले. यावरून सदर संशयित इसम हा सोनसाखळी चोर असण्याचा दाट संशय आल्याने सदर पथकाने त्याचेकडे कसोशीने व कौशल्यपुर्ण चौकशी केली असता त्याने गंगापुर पोलीस ठाणे गुरनं. १९८/२०२१ कलम ३९२ भा.दं.वि. हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पोउनि संजय भिसे यांनी दि. २१ ऑक्टोबर २०२१ रोजी सदर गुन्हयात अटक केली. त्यानंतर सदर आरोपीताकडे कसोशीने तपास करून त्याचे घराची झडती घेतली असता, त्याचे घरामध्ये २७ तुटलेले सोन्याचे मंगळसुत्र, चैन व पोत असे दागिणे व रोख रक्कम २ लाख ५०,००० रूपये मिळुन व आले. यावरून सदर आरोपी हा सोनसाखळी चोरी करणारा सराईत आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्याचेकडुन हस्तगत करण्यात आलेल्या २७ तुटलेल्या सोन्याचे मंगळसुत्र, चैन व पोत असे दागिणे यांची तहसिलदार यांचेसमक्ष २७ गुन्हयातील फिर्यादी महिलांना बोलावुन ओळखपरेड घेतली असता त्यांनी त्यांचे दागिणे ओळखले आहेत.
त्यामुळे सदर आरोपीताकडे कसोशीने व कौशल्यपुर्ण तपास करून त्याचे सदर गुन्हयातील साथीदार, त्यांनी केलेले गुन्हे याबाबत तपास करणेकरीता मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- १, नाशिक शहर यांनी गंगापुर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे अधिपत्याखाली विशेष तपास पथक तयार करून सदर पथकात सपोनि सत्यवान पवार पंचवटी पोलीस ठाणे, सपोनि हेमंत तोडकर आडगाव पोलीस ठाणे व गंगापुर पोलीस ठाण्याचे सपोनि प्रविण सुर्यवंशी, पोउनि संजय भिसे, पोहवा भारत बोळे, पोना रविंद्र मोहीते, पोना मिलींद परदेशी, गिरीष महाले, योगेश चव्हाण, पोशि घनश्याम भोये, सुनिल पाडवी, दिपक जगताप, तुलसीदास चौधरी, समाधान शिंदे यांची नेमणूक केली होती.
आरोपी शिक्षण सिव्हिल इंजिनिअरिंग ;मैत्रिणींसोबत मौजमजा करण्याकरीता व दारूच्या पाटर्या करणेकरीता केल्या चोऱ्या :
नेमलेल्या विशेष पथकाने अमोल तांबे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – १, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रियाज शेख यांचे मार्गदर्शनाखाली आरोपी दंगल उर्फ उमेश अशोक पाटील याचेकडे कसोशीने व कौशल्याने तपास केला असता सदर तपासामध्ये तो इंजिनियर असल्याचे तसेच त्याने व त्याचा साथीदार तुषार बाळासाहेब ढिकले अशांनी मिळुन त्यांचे मैत्रिणींसोबत मौजमजा करण्याकरीता व दारूच्या पाटर्या करणेकरीता सन २०१८ पासुन ते माहे नोव्हेंबर २०२० दरम्यान त्यांचेकडील यामाहा कंपनीचे एफ. झेड. या स्पोर्ट बाईकने नाशिक शहरात विविध ठिकाणी रस्त्याने पायी चालणाऱ्या महिलांचे गळ्यातील सोनसाखळ्या चोरी केल्याचे निष्पन्न झाले. परंतु त्याचा साथीदार तुषार ढिकले व त्याचेत बेबनाव झाल्याने माहे नोव्हेंबर २०२० पासुन आरोपी दंगल उर्फ उमेश अशोक पाटील याने एकटयाने त्याचे यामाहा कंपनीचे एफ. झेड. या स्पोर्ट बाईकने नाशिक शहरात सोनसाखळी चोरीचे गुन्हे केले आहेत.
सदर गुन्हयाचे तपासात आरोपी नामे तुषार ढिकले यास ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास केला असता त्याने दंगल उर्फ उमेश पाटील याचे साथीने नाशिक शहरात विविध ठिकाणी २० सोनसाखळी चोरीचे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले व गुन्हयांमधील सोनसाखळ्या या त्यांनी त्यांचा मित्र विरेंद्र उर्फ सॅम शशिकांत निकम याचे मदतीने सोनार नामे गोपाळ विष्णु गुंजाळ यास विक्री केल्याचे निष्पन्न झाल्याने गोपाळ विष्णु गुंजाळ यास सदर गुन्हयात अटक करून तपास केला असता त्याने सदरचा मुद्देमाल हा आंबिका ज्वेलर्स, सराफ बाजार, नाशिक येथील अशोक पंढरीनाथ वाघ यास विक्री केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचेकडे केलेल्या तपासात त्याने सदर सोन्याचे दागिणे वितळवुन त्याच्या लगडी बनविल्याने त्याचेकडुन सुमारे २५० ग्रॅम वजनाच्या ९ लाख ६६ हजार ६६८/- रूपये किंमतीच्या एकुण २० सोन्याच्या लगडी हस्तगत केल्या आहेत. तसेच आरोपी नामे दंगल उर्फ उमेश पाटील याने एकटयाने चोरी केलेल्या सोनसाखळ्या त्याने सदर गुन्हयातील सोनार नामे मुकुंद गोविंद बागुल याचे मार्फतीने सोनार नामे मुकुंद केदार दयानकर यास विक्री केल्याचे सांगितल्याने त्याचेकडुन सुमारे ९० ग्रॅम वजनाच्या २,९७,३००/- रूपये किंमतीच्या एकुण ०९ सोन्याच्या लगडी हस्तगत केल्या आहेत.
आरोपी च्या नावे इतकी संपत्ती :
सदर गुन्हयातील आरोपी दंगल उर्फ उमेश अशोक पाटील याची मालमत्ता तपासणी केली असता त्याने ४८ लाख रूपये देवुन एक फ्लॅट, एक हयुदांई क्रेटा कार खरेदी केल्याचे व त्याचे दोन बँक खात्यामध्ये २० लाख रूपये जमा असल्याचे निष्पन्न झाले असुन त्याबाबत सविस्तर तपास चालु आहे.
ओझर चा गुन्हा उघडकीस :
सदर आरोपीतांकडे केलेल्या एकंदरीत तपासात आरोपी दंगल उर्फ उमेश पाटील व तुषार ढिकले यांनी ओझर पोलीस ठाणे हद्दीत सन २०२० मध्ये स्कॉर्पिओ चालकास आडवुन त्यास जबर मारहाण करून त्याची स्कॉर्पिओ गाडी चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन त्याबाबत ओझर पोलीस ठाणे येथे कलम ३९४,३४१, ३४ अन्वये गुन्हा नोंद असुन त्याबाबत ओझर पोलीस ठाणेस माहीती देण्यात आली आहे. तसेच सदर आरोपीतांनी नाशिक पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत खालीलप्रमाणे एकुण ५६ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असुन त्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर गुन्हयात आरोपीतांना अटक करण्यात आली आहे. दंगल उर्फ उमेश अशोक पाटील वय २७ वर्षे, रा. रत्नदीप रो हाऊस, जय भवानी रोड, नाशिकरोड, नाशिक तुषार बाळासाहेब ढिकले, वय ३० वर्षे, रा. फ्लॅट नं. ९, परम हाईट्स, शिवकृपा स्विटजवळ, आडगाव शिवार, नाशिक, विरेंद्र उर्फ सॅम शशिकांत निकम, वय ३४ वर्षे, रा. फ्लॅट नं. १०६, स्मृती बिल्डींग, खरजुल मळा, सिन्नर फाटा, नाशिक, गोपाल विष्णु गुंजाळ, वय ३४ वर्षे, रा. फ्लॅट नं. १, अनमोल अपा, बी. हॅपी होम कॉलनी, पोर्णिमा बसस्टॉप नाशिक सदर आरोपीतांकडुन पोलीस आयुक्तालय हद्दीतील ५६ गुन्हे उघडकीस आणुन त्यांचेकडून ७१ तोळे सोन्याचे दागिणे, लगडी व रोख रक्कम २,५०,०००/- रूपये असा एकूण २९,३२.१७६/- रूपये .चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.


