नाशिक मिरर :   नाशिक महानगरपालिकेच्या सातपूर प्रभाग समिती सभापती ची निवडणूक दि.१९ जुलै रोजी होत आहे. दि. १५ गुरुवार रोजी शिवसेनेच्या वतीने मधुकर जाधव यांनी तर मनसे च्या वतीने योगेश शेवरे यांनी नामनिर्देशनपत्र सादर केले आहे. सातपूर विभागामध्ये एकूण ५ प्रभागामध्ये २० नगरसेवक आहेत. यामध्ये ९ भाजपाचे, ८ शिवसेनेचे, २ मनसे चे तर १ रिपाई असे संख्याबळ सातपूर विभागात आहे. सभापती निवड करण्यासाठी कोणाकडे ही बहुमत नसल्याने सातपूर विभागात गेल्या चार प्रभाग सभापती निवडणूकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंगमेकरची भूमिका बजावत आहे. मनसे ने सातपूर मध्ये वाटाघाटी पध्दतीचा अवलंब करून पहिल्या वर्षी  भाजपाला मनसेचे दोन नगरसेवक सलीम शेख व योगेश शेवरे यांनी पाठींबा देऊन  प्रभाग १० मधील नगरसेविका माधुरी बोलकर या प्रभाग सभापती झाल्या होत्या. तर दुसऱ्या वर्षी प्रभाग ११ मधील नगरसेवक योगेश शेवरे यांना भाजपाने पाठिंबा दिल्याने प्रभाग सभापतीची संधी मिळाली होती. योगेश शेवरे यांच्या  एक वर्षाचा सभापती कार्यकाळात लोकसभा व प्रभाग १० मधील पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तब्बल पाच महिने कामकाज करता आले नव्हते. तर तिसऱ्या वर्षी मनसेने शिवसेनेच्या संतोष गायकवाड यांना पाठिंबा दिल्याने गायकवाड सभापती झाले होते. चौथ्या वेळी  मनसेच्या नगरसेवकांनी पुन्हा भाजपाचे उमेदवार रवींद्र धिवरे यांना पाठिंबा दिल्याने धिवरे प्रभाग सभापती झाले होते.पंचवार्षिक शेवटच्या वर्षी प्रभाग सभापती निवडणूकीत भाजपा पुन्हा मागील वर्षी मनसे केलेल्या मदतीची परतफेड मनसे उमेदवार योगेश शेवरे यांना पाठिंबा देऊन करणार असल्याचे दिसून येत आहे.१५ जुलै रोजी दु.२ वाजता नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ होती.सातपूर विभागा मधून भाजपा च्या वतीने नामनिर्देशन पत्र दाखल केलेले नसल्याने भाजपा चे ९ सदस्य व मनसे २ सदस्य असे मिळून आवश्यक असलेले ११ सदस्यांचे बहुमत होत असल्याने मनसे चे योगेश शेवरे यांच्या गळ्यात दुसऱ्यादा प्रभाग सभापती ची माळ गळ्यात पडणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. परंतु सदर प्रभाग सभापती निवडणूकीत भाजपाचे सातपूर मधील सर्व सदस्य काय निर्णय घेतात यावर ही प्रभाग सभापती कोण होणार हे ठरणार आहे.

बातम्या

Don`t copy text!