शिवसैनिकांचा सवाल;आयुष्यभर झेंडेच पकडायचे का ?
शिवसेनेतील आयात उमेदवारांना आम्हीच पाडणार – सातपूर शिवसैनिक
नाशिक मिरर :
नाशिक मनपा सार्वत्रिक निवडणूक तोंडावर आलेली असताना पक्षातराच्या लाटेला प्रारंभ झाला आहे.विविध पक्षामध्ये आयाराम, गयराम नाट्य सुरू झाले आहे. सातपूर मधील इतर पक्षाचे आजी माजी नगरसेवक शिवसेनेच्या लाटेवर स्वार होऊ इच्छित आहेत. त्यामुळे अनेक नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असून या आयारामांविरोधात सातपूर शिवसैनिकांनी वज्रमुठ केली आहे . याबाबत बुधवार रोजी शिवसैनिक,पदाधिकारी व नगरसेवक यांची एकत्रित बैठक संपन्न झाली. सातपूर मध्ये आयुष्यभर आम्ही हातात झेंडेच घ्यायचे का ? असा सवाल उपस्थित करत एनवेळी पक्षात प्रवेश करणाऱ्या उमेदवारांना आम्हीच पाडू असा एकेरी सुर शिवसेनेच्या बैठकीत निघाला.
मनपा गटनेते विलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली त्रंबकरस्त्यावरील सौभाग्य लॉन्सवर शिवसेनेचे नगरसेवक तथा आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसैनिकांनी आयात उमेदवारांविरोधात उघडपने नाराजी व्यक्त केली. गेल्या निवडणुकीत ज्यांच्या विरोधात कामे केली, त्यांना उमेदवारी दिल्यास कुठल्या तोंडाने मतदारांकडे मते मागायची ? असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. केवळ लाटेच्या आणि पैशाच्या जोरावर पक्ष प्रवेश करणाऱ्यांना शिवसेनेने स्पष्टपणे नाकारावे. जिथे मध तिथे माशा अशी काहीशी परिस्थिती झालेल्या आयात उमेदवारांना शिवसेनेने त्यांना त्यांची जागा दाखवून द्या, अन्यथा त्या उमेदवाराला पाडण्यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवाराची गरज नसून आम्हीच त्या उमेदवाराला पाडू अशा शब्दात आयात उमेदवाराविरोधात शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, केवळ एका प्रभागापुरते न बोलता संपूर्ण नाशिक शहराचा विचार शिवसेनेने करावा. दहा पक्ष फिरून आलेल्या शिनसैनिकालाही पक्षाने उमेदवारी नाकारली पाहिजे असे मत नगरसेवक भागवत आरोटे यांनी व्यक्त केले.
यावेळी नगरसेवक भागवत आरोटे, मधुकर जाधव, संतोष गायकवाड, सीमा निगळ, नयना गांगुर्डे, उपमहानगरप्रमुख देवा जाधव, दीपक मौले, संजय जाधव, विजय बुरकूल, शांताराम कुटे, आनंद दिघोळे, गोकुळ नागरे, गोकुळ निगळ, विलास आहेर, वृषाली सोनवणे, श्याम फर्नांडिस, सुभाष गुबाडे, मच्छिन्द्र धुळे, स्वप्नील आव्हाड, लोकेश गवळी, जी. एस. सावळे, यशवंत पवार, निवृत्ती इंगोले, अशोक पारखे आदिसह शिवसेनेचे आजी माजी पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक उपस्थित होते.
आयुष्यभर सतरंज्या उचलायच्या का?
कुठल्याही पदाची किंवा तिकिटाची अपेक्षा न करता हाडाचे शिवसैनिक म्हणून अनेकांनी काम केले आहे. आज एन निवडणुकीत उमेदवार आयात केल्यास आम्ही आयुष्यभर सतरंज्या उचलायच्या का?
– मच्छिन्द्र धुळे, ज्येष्ठ शिवसैनिककेवळ एका प्रभागापुरते न बोलता संपूर्ण नाशिक शहराचा विचार शिवसेनेने करावा. दहा पक्ष फिरून आलेल्या शिनसैनिकालाही पक्षाने उमेदवारी नाकारावी.
– भागवत आरोटे, नगरसेवक
शिसैनिकांची खंत वरिष्ठांकडे मांडणार
शिवसेना एकमेव संघटना आहे, जिथे स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाच निर्णय घेत नाही. आयाराम विरोधात शिवसैनिकांची नाराजी वरिष्ठांकडे मांडू.
– विलास शिंदे, गटनेते नाशिक मनपा
