सातपूर :नाशिक मिरर वृत्तसेवा

शहरातील सातपूर परिसरात ईएसआय क्लब हाऊस जवळील रस्त्यावर सोमवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे रस्त्यालगत उभे असलेले मोठे गुलमोहराचे झाड कोसळले आणि त्याखाली आलेल्या दुचाकीवरील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव भास्कर रिपोटे (वय २१) आणि सम्यक भोसले हे दोघे आपल्या एक्टिवा दुचाकीवरून ईएसआय ग्राउंडजवळून जात होते. याच दरम्यान अचानक जोरदार वारा सुटला आणि मोठ्या आवाजात रस्त्यालगतचे एक जुने गुलमोहराचे झाड त्यांच्या दुचाकीवर कोसळले. झाड इतके मोठे होते की दोघांनाही सावरण्याची संधी मिळाली नाही. घटनास्थळीच एकाचा तर उपचार दरम्यान दुसऱ्या युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दोघे युवक नाशिक रोड येथील मालधक्का रोडवरील गुलाबवाडी परिसरात राहत होते. मृत गौरव रिपोटे आणि सम्यक भोसले हे जवळचे मित्र होते आणि दोघेही काही वैयक्तिक कामानिमित्त सातपूरमध्ये आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. अपघात घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना आणि आपत्कालीन सेवांना माहिती दिली. काही वेळातच पोलिस आणि महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. झाड हटवण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार,औद्योगिक वसाहती मध्ये रस्त्यालगत अनेक जुनी आणि धोकादायक झाडे आहेत, परंतु संबंधित प्रशासनाकडून वेळोवेळी योग्य ती देखभाल छाटणी केली जात नाही. या घटनेने धोकादायक वृक्षचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिकांनी महापालिकेकडे या धोकादायक झाडांची तातडीने तपासणी करून छाटणी करण्याची मागणी केली आहे.

सातपूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

बातम्या

Don`t copy text!