नाशिक मिरर न्यूज, सातपूर (प्रभाग क्र. २६):
सातपूर परिसरातील चुंचाळे शिवारात सध्या भीषण स्थिती निर्माण झाली आहे. चुंचाळे गाव, सातपूर गाव, विराट संकुल, जाधव संकुल, बजरंग नगर आणि नगर म्हाडा कॉलनी या परिसरातून वाहणाऱ्या नैसर्गिक नाल्यांमध्ये ठिकठिकाणी ड्रेनेजचे चेंबर्स फुटले असून, त्यातून थेट सांडपाणी मोठ्या प्रमाणावर नाल्यांमध्ये मिसळत आहे. यामुळे संपूर्ण परिसर दुर्गंधीने भरून गेला आहे आणि डासांचे साम्राज्य पसरले आहे.
नाले झाले गटारीसमान, आरोग्य धोक्यात!
नैसर्गिक नाल्यांमध्ये मिसळणारे हे सांडपाणी थेट नंदिनी (नासर्डी) नदीकडे आणि त्यानंतर गोदावरीकडे वाहत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीनेही ही बाब अत्यंत गंभीर आहे. सदर नाले सध्या गटारीसारखे दिसू लागले असून, आरोग्याच्या दृष्टीने मोठा धोका निर्माण झाला आहे. दुर्गंधीमुळे श्वास घेणेही मुश्कील झाले आहे. नागरिक डासांच्या त्रासाने त्रस्त झाले असून, डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत.महापालिकेचे ‘दोनघटके’चे उपाय अपुरे!
[IT_EPOLL id=”https://youtu.be/xazqU8nF–o?si=4eXVfSpwrrDE6RRp”][/IT_EPOLL]
नाशिक महापालिकेच्या वैद्यकीयविभागाकडून डेंग्यू रोखण्यासाठी घरोघरी तपासण्या सुरू आहेत, मात्र प्रत्यक्षात डासांची मूळ उत्पत्ती ठिकाणे म्हणजे हे नैसर्गिक नाले – त्याकडे प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष आहे. सांडपाण्यामुळे डासांना अंडी घालण्यासाठी पोषक ठिकाणे मिळत आहेत आणि त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे.
नागरिकांचा संताप उफाळून आला!
या भयानक समस्येकडे लक्ष वेधत सह्याद्री शिवस्वराज्य सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप तांबे व परिसरातील नागरिकांनी महापालिकेला जाब विचारला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत प्रशासनाला इशारा दिला आहे – “निव्वळ डास मारून उपयोग नाही, मूळ कारणावर उपाय करा! अन्यथा जनआंदोलनाची तयारी ठेवा!”
महापालिकेला जाग येणार का?
चुंचाळे परिसरातील ही गंभीर समस्या केवळ आरोग्याचे नव्हे, तर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. नागरिकांनी आता प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे – “प्रशासन कधी जागं होणार?”
नागरिकांची मागणी स्पष्ट आहे –
1. फुटलेले ड्रेनेज चेंबर्स तातडीने दुरुस्त करा.
2. नैसर्गिक नाल्यांमध्ये मिसळणारे सांडपाणी थांबवा.
3. नियमित फॉगिंग व औषध फवारणी करा.
4. डासांची मूळ उत्पत्ती असलेली ठिकाणे कायमस्वरूपी नष्ट करा.
नाशिक महापालिकेने आता तरी झोपेतून जागे व्हावे, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा स्पष्ट इशारा नागरिक देत आहेत.

