कारगिल विजय दिनानिमित्त कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम
नाशिक मिरर वृत्तसेवा : देवळा प्रतिनिधी
देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीर जवानांच्या सन्मानार्थ कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, देवळा येथील राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभागाच्या वतीने ‘कारगिल विजय दिन’ उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनसीसी अधिकारी लेफ्टनंट बादल लाड यांनी केले. त्यांनी कारगिल युद्धाची ऐतिहासिक पार्श्वभूमी उलगडत भारताच्या रणनिती, शौर्यगाथा आणि विजयाचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर मांडले.
यानंतर वीर शहीदांना पुष्पांजली अर्पण करून मौन पाळत श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रगीत घेण्यात आले. शेवटी “भारत माता की जय”, “वंदे मातरम्” आणि “जय जवान” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर देशभक्तीमय झाला.
विद्यार्थिनी केजल पाटील हिने ‘कारगिल विजय दिन’ या विषयावर माहितीपूर्ण भाषण सादर केले. तिने शौर्य, बलिदान आणि मातृभूमीवरील प्रेम या मूल्यांची जाणीव करून देत तरुणांना प्रेरित केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की,“कारगिल विजय दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा दिवस नाही, तर देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या जवानांचे स्मरण करत आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. तरुणांनी देशासाठी कार्य करण्याची प्रेरणा याच क्षणांतून घ्यायला हवी. तरुण पिढीने देशासाठी पुढे यावं, हेच वीर जवानांचं खऱ्या अर्थानं स्मरण आहे.”
या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. डी.के. आहेर, डॉ. जयवंत भदाणे, डॉ. एस.डी. ठाकरे, डॉ. विलास वाहुळे, डॉ. सुरवसे, डॉ. जयमाला चंद्रात्रे, प्रबंधक श्री. दिनेश वाघमारे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन कु. यशोधन देवरे यांनी केले.