नितीन बाळा निगळ यांचा भाजपात रविवारी प्रवेश
नाशिक मिरर वृत्तसेवा :
नाशिक शहर आणि सातपूर परिसरातील ओळखले जाणारे समाजसेवक व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नितीन (बाळा) निगळ हे रविवार, दि. २७ जुलै रोजी भारतीय जनता पक्षात (भाजपा) प्रवेश करणार आहेत.
नितीन निगळ हे सातपूर विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक असून, औद्योगिक वसाहतीतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा, नागरिकांच्या स्थानिक समस्या सोडवण्यासाठी आंदोलन, निवेदन आणि अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा, सातपूर शिवजन्मोत्सवाची सुरुवात, नवरात्रउत्सव, महिलां, युवक, जेष्ठ नागरिकांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवून, विविध सामाजिक उपक्रमांतून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.
नितीन बाळा निगळ यांच्या प्रवेशामुळे सातपूर प्रभाग क्रमांक ११ मध्ये भाजपाला नवे बळ मिळणार असून संघटनवाढीस गती मिळेल, असे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
बागूल-राजवाडे यांच्यासोबत निगळ यांचाही प्रवेश
रविवारी होणाऱ्या या सोहळ्यात शिवसेना (ठाकरे गटाचे) माजी उपनेते सुनील बागूल, माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे हेही भाजपात प्रवेश करणार आहेत. या तिघांच्या प्रवेशामुळे नाशिक शहरातील भाजपची संघटनशक्ती आणखी बळकट होईल, असे मानले जात आहे.
नितीन निगळ यांचा राजकीय प्रवास :
नितीन निगळ यांचा राजकीय प्रवास विविध टप्प्यांतून झाला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनातून राजकारणाला सुरुवात, नंतर भाजपात थोडा काळ सक्रिय,त्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश करून युवक शहराध्यक्षपद भूषवले.आणि आता पुन्हा भाजपात पुनरागमन करत आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये शहराध्यक्षपद भूषवताना निगळ यांनी युवकांना संघटित करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. सामाजिक कामामुळे त्यांनी स्थानिक पातळीवर मजबूत पकड निर्माण केली.
२०१७ महापालिका निवडणूक व कामगिरी :
फेब्रुवारी २०१७ च्या नाशिक महापालिका निवडणुकीत प्रभाग ११ मधून नितीन निगळ यांनी उमेदवारी केली होती.
त्या वेळी मनसेचे दोन उमेदवार, शिवसेनेचा एक आणि रिपाईचा एक उमेदवार विजयी झाला होता.
निगळ यांनी दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मतसंख्या मिळवून कमी फरकाने पराभव स्वीकारला होता.
सातपूरमध्ये प्र. क्र ११ मध्ये भाजपला मिळणार बळ :
सातपूर प्रभाग क्रमांक ११ मध्ये सध्या मनसे, शिवसेना आणि रिपाई असा संमिश्र प्रभाव आहे. अशा परिस्थितीत निगळ यांचा प्रवेश झाल्याने भाजपला स्थानिक पातळीवर नवे नेतृत्व मिळेल. येत्या महापालिका निवडणुकीत हा प्रवेश भाजपसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
प्रवेश सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती :
गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात होणाऱ्या या प्रवेश सोहळ्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, भाजपचे सर्व आमदार, तसेच जिल्हा व शहरस्तरीय नेते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची उपस्थिती राहील, अशी माहिती समोर आली आहे.
हा प्रवेश सोहळा नाशिकच्या आगामी महापालिका निवडणुकीच्या समीकरणांवर मोठा प्रभाव टाकू शकतो.
