नाशिकचे मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांचा राज ठाकरे यांना मोठा धक्का
नाशिक मिरर वृत्तसेवा :
नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात गुरुवारी अत्यंत वेगवान आणि धक्कादायक घडामोडी घडल्या. राज्यातील सत्ताधारी भाजपने आक्रमक भूमिका घेत इतर पक्षांतील बड्या नेत्यांना आपल्या गोटात खेचण्यास सुरुवात केली असून, त्याचा मोठा फटका मनसे आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेला बसला आहे.
बुधवारी मुंबईत मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी युतीची घोषणा केली होती. या घोषणेनंतर नाशिकमधील मनसे कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला होता. मनसेचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनीही यावेळी कार्यकर्त्यांसह आनंदोत्सव साजरा करत पेढे वाटले, नाचले होते.
मात्र, अवघ्या २४ तासांतच राजकीय चित्र पूर्णपणे बदलले. गुरुवारी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करत राज ठाकरे यांना मोठा धक्का दिला. त्यांच्या सोबत शिवसेना (ठाकरे गट) चे माजी महापौर विनायक पांडे आणि माजी महापौर ॲड. यतीन वाघ यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
इतक्यावरच न थांबता दिनकर पाटील यांचे पुत्र अमोल पाटील, माजी नगरसेविका लता पाटील तसेच माजी नगरसेवक रवींद्र धिवरे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केल्याने मनसेला मोठा धक्का बसला आहे.
पांडे आणि वाघ यांच्या भाजप प्रवेशाची माहिती मिळताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कठोर भूमिका घेत दोघांचीही पक्षातून हकालपट्टी केल्याचा निर्णय जाहीर केला.
दरम्यान, भाजपमधील या पक्षप्रवेशावर स्थानिक स्तरावर नाराजीही व्यक्त होत आहे. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ, माजी नगरसेवक संजय चव्हाण आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक शाहू खैरे यांच्या प्रवेशाला तीव्र विरोध दर्शविला. त्यांच्या समर्थकांनी भाजप कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
तसेच, मनसे नेते दिनकर पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे नाशिकमधील भाजपच्या स्थानिक आमदार सीमा हिरे यांच्यातही नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घडामोडींमुळे नाशिकचे राजकारण अधिक तापले असून, येत्या काही दिवसांत आणखी मोठ्या राजकीय उलथापालथी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
