नाशिक मिरर वृत्तसेवा :
नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik MC Election) पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्जांच्या छाननीदरम्यान मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)च्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्याची मागणी भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी केली असून, यासंदर्भात त्यांनी थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली आहे.
निवडणूक अर्जांची स्थिती
महापालिकेच्या १२२ जागांसाठी एकूण २,३५७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शेवटच्या दिवशीच १,३३१ उमेदवारांनी अर्ज भरले. बुधवारी निवडणूक अधिकाऱ्यांकडून वैध अर्जांची छाननी सुरू आहे.
पक्षनिहाय उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे—
भाजप: ११८ (प्रभाग १४ मध्ये उमेदवार नाही)
शिवसेना (शिंदे गट): ८०
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार): ४१
शिवसेना (ठाकरे गट): ८२
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार): ३१
मनसे: ३४
काँग्रेस: २२
आप: ३५
माकप: ०९
यामुळे नाशिकमधील निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत.
आक्षेप नेमका काय?
भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,
निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार प्रत्येक पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या अर्जासोबत जोडपत्र–२ (बी-फॉर्म) जोडणे बंधनकारक आहे आणि त्यावर मूळ (Original) स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.
मात्र, ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या अर्जासोबत जोडण्यात आलेल्या बी-फॉर्मवर डिजिटल स्वाक्षरी करण्यात आली आहे. निवडणूक नियमावलीनुसार डिजिटल स्वाक्षरी असलेले जोडपत्र वैध धरता येत नाही. त्यामुळे हा नियमभंग असल्याचा दावा करत, ठाकरे गटाच्या सर्व उमेदवारांचे अर्ज तात्काळ बाद करावेत, अशी मागणी केदार यांनी केली आहे.
पुढे काय?
या तक्रारीवर निवडणूक अधिकारी काय निर्णय घेतात, याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. जर हा आक्षेप मान्य झाला, तर ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का ठरू शकतो; अन्यथा हा वाद राजकीय आरोप-प्रत्यारोपांपुरताच मर्यादित राहण्याची शक्यता आहे.

