२ जानेवारीच्या माघारीनंतरच नाशिक मनपा निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार
नाशिक मिरर वृत्तसेवा :
नाशिक महानगरपालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातपूर विभागातील उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया निवडणूक प्रशासनाच्या उपस्थितीत शांततेत पार पडली. यावेळी मनपा कार्यालय परिसरात उमेदवार व त्यांच्या समर्थकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली.
या छाननी प्रक्रियेत उमेदवारांनी सादर केलेल्या सर्व उमेदवारी अर्जांची बारकाईने तपासणी करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रत्येक अर्जासोबत जोडलेली शपथपत्रे, जात वैधता प्रमाणपत्रे, मालमत्ता व उत्पन्नाचा तपशील, गुन्हेगारी पार्श्वभूमीविषयक माहिती तसेच इतर आवश्यक कागदपत्रांची सखोल पडताळणी केली.
सातपूर विभागात एकूण ३०५ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर १७२ उमेदवारांचे २५८ अर्ज वैध, तर ४८ अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत.
छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा टप्पा असून, ही प्रक्रिया दि. २ जानेवारी रोजी पार पडणार आहे. माघारीनंतरच कोणकोणत्या उमेदवारांमध्ये अंतिम लढत होणार, कोणत्या प्रभागात सरळ सामना असेल की अटीतटीची लढत, याचे स्पष्ट चित्र समोर येणार आहे.
सातपूर विभागात विविध राजकीय पक्षांचे अधिकृत उमेदवार तसेच मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवार रिंगणात उतरल्याने परिसरातील राजकीय वातावरण तापले आहे. अर्ज वैध ठरल्याने उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, माघारीनंतर प्रचाराला वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आता २ जानेवारीनंतर सातपूरमधील महापालिका निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार असून, त्यानंतर प्रचाराचा धुराळा उडणार हे निश्चित आहे.
प्रभाग क्र. १० : भाजपा उमेदवारीवरून संभ्रम दूर
प्रभाग क्र. १० मधील ‘ब’ गटाच्या जागेसाठी भारतीय जनता पार्टीकडून कलावती इंद्रभान सांगळे व जान्हवी मनोज तांबे या दोन्ही उमेदवारांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत एबी फॉर्म जोडल्याने चर्चेला उधाण आले होते.
मात्र शहराध्यक्षांनी लेखी पत्र देत कलावती इंद्रभान सांगळे यांचा एबी फॉर्म ग्राह्य धरण्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. तसेच त्यांनी सर्वात आधी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने, नियमांनुसार कलावती इंद्रभान सांगळे यांना भाजपा कडून अधिकृत उमेदवारी मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
