पराभवानंतरही जनतेच्या हृदयात विजयी!

नाशिकमध्ये पराभूत उमेदवारांचे अश्रूंनी स्वागत; “तुम्हीच आमच्या मनातील नगरसेवक”

सातपूर :नाशिक मिरर वृत्तसेवा

नाशिक महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत काही उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला असला, तरी जनतेच्या मनातील प्रेम, विश्वास आणि आपुलकीमुळे ते खऱ्या अर्थाने विजयी ठरल्याचे भावूक चित्र सातपूर परिसरात पाहायला मिळाले.

निवडणूक निकालानंतर पराभव स्वीकारत मतदारांचे आभार मानण्यासाठी प्रभागातील नागरिकांच्या भेटीला गेलेल्या उमेदवारांचे अनेक ठिकाणी डोळ्यांत अश्रू आणणाऱ्या स्वागताने नागरिकांनी आपली भावना व्यक्त केली. “निवडणूक जिंकली नसली तरी तुम्हीच आमच्या मनातील नगरसेवक आहात,” असे म्हणत नागरिकांनी उमेदवारांचा सन्मान केला.

सातपूर प्रभाग क्रमांक ११ मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पराभूत उमेदवार सलीम शेख यांनी निकालाच्या दुसऱ्याच दिवशी सातपूर कॉलनी व स्वारबाबानगर परिसरातील मतदारांची भेट घेत आभार मानले. यावेळी केवळ मतदारच नव्हे, तर त्याच प्रभागातील पराभूत माजी नगरसेविका दीक्षा लोणढे यांचीही भेट घेऊन त्यांना दिलासा दिला.

प्रचारादरम्यान मिळालेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गेलेली ही भेट अनेक ठिकाणी भावनिक बनली. नागरिकांनी फुलहार घालून, मिठाई वाटत आणि डोळ्यांत अश्रू आणत उमेदवारांचे स्वागत केले.

“निवडणूक जिंकली नाही तरी तुम्ही नेहमी आमच्यासाठी काम केलं. आमच्या सुख-दुःखात उभे राहिलात. म्हणूनच आमच्या मनात तुम्हीच नगरसेवक आहात,” अशा शब्दांत नागरिकांनी भावना व्यक्त केल्या.

“जनतेचे प्रेमच माझे खरे भांडवल” – सलीम शेख

या प्रसंगी मनसेचे उमेदवार सलीम शेख हेही भावूक झाले.

 

“पद असो वा नसो, जनतेचे प्रेम आणि विश्वास हेच माझे खरे भांडवल आहे. मी कायम तुमच्या सेवेसाठी तत्पर राहीन,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

प्रभाग ८ मध्येही असाच सन्मान

दरम्यान, प्रभाग क्रमांक ८ मधील भाजपाचे पराभूत उमेदवार प्रवीण पाटील यांचे गंगापूर गावात नागरिकांनी घरासमोर रांगोळ्या काढत स्वागत केले. पराभवानंतरही मिळालेल्या या सन्मानामुळे परिसरात सकारात्मक चर्चा रंगल्या.

नाशिकच्या राजकीय जीवनात हा प्रसंग लोकशाहीतील जनते आणि प्रतिनिधींमधील नात्यांचे वेगळेच दर्शन घडवणारा ठरला आहे. निवडणुकीतील विजय-पराभवापलीकडे जाऊन जनतेच्या मनात स्थान मिळवणे हेच खरे यश असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

बातम्या

Don`t copy text!