अशोकनगर रस्त्यावर मालवाहतूक गाडीतून लोखंडी पाईप रस्त्यावर; जीवितहानी टळली

नाशिक मिरर वृत्तसेवा:
अशोकनगर रस्त्यावरून अवैधरीत्या लांब व जाड लोखंडी पाईप वाहतूक करणाऱ्या चारचाकी मालवाहतूक गाडीमधून अचानक पाईप रस्त्यावर आल्याने मोठी दुर्घटना टळली. शुक्रवारी (दि. १८ एप्रिल) दुपारी २ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

एमएच १५ जीव्ही ६२४७ क्रमांकाची मालवाहतूक गाडी, चालक अर्जुन भारद्वाज याच्या नियंत्रणाखाली, अंबड लिंक रोडवरून अशोकनगर रोड मार्गे गंगापूर रोडकडे जात होती. गाडीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त पाईप लादण्यात आले होते. अशोकनगर बसथांब्यावर अचानक समोरील रिक्षाचालकाने ब्रेक मारल्याने, भारद्वाज यालाही ब्रेक द्यावा लागला. त्यामुळे गाडीत लादलेले सर्व पाईप्स थेट रस्त्यावर कोसळले.

https://youtu.be/lWE5NDqIX6I?si=BueHoxoIVA98nvRc

सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अशा प्रकारची बेपर्वा व नियमबाह्य वाहतूक नाशिक शहरात खुलेआम सुरू असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे. वाहतूक पोलिसांकडून योग्य कारवाई होत नसल्याने वाहनचालक बेधडकपणे धोकादायक मालवाहतूक करत असल्याचे निदर्शनास येत आहे.

काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारच्या एका घटनेत, मुंबई-आग्रा महामार्गावर सिडको परिसरातील नऊ तरुणांनी आपले प्राण गमावले होते. अशा घटना रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.

घटनेनंतर क्रेनच्या साहाय्याने सदर मटेरियल दुसऱ्या वाहनात हलविण्यात आले.

बातम्या

Don`t copy text!