नाशिक मिरर वृत्तसेवा | नाशिक
Nashik Municipal Corporation च्या आज (सोमवारी) पार पडलेल्या महासभेत स्थायी समितीच्या १६ सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विविध पक्षांच्या गटनेत्यांनी महापौरांकडे नावे सुपूर्द केल्यानंतर सभागृहात अधिकृत घोषणा करण्यात आली. या निवडीमुळे आगामी आर्थिक निर्णयप्रक्रियेवर प्रभाव टाकणाऱ्या स्थायी समितीची रचना स्पष्ट झाली आहे.
पक्षनिहाय जागावाटप
भाजप – ९ जागा
शिंदे सेना – ४ जागा
शिवसेना (उबाठा) – २ जागा
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – १ जागा
भाजपचे ९ सदस्य
माधुरी बोलकर, नितीन निगळ, पल्लवी गणोरे, दीपाली कुलकर्णी, इंदुबाई खेताडे, आदिती पांडे, सरिता सोनवणे, जयश्री गायकवाड आणि मच्छिंद्र सानप यांची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी माधुरी बोलकर आणि मच्छिंद्र सानप यांची नावे आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शिंदे सेनेतून ४ जण
किरण गामणे, राहुल दिवे, रंजना बोराडे आणि मनसेच्या मयुरी पवार यांची निवड झाली आहे.
शिवसेना (उबाठा) व राष्ट्रवादीकडून
शिवसेना (उबाठा) कडून भारती ताजनपुरे आणि योगेश गाडेकर यांना संधी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
मनसेच्या एकमेव नगरसेविकेची ‘लॉटरी’
मनसेच्या एकमेव नगरसेविका मयुरी पवार यांनी शिंदे सेनेसोबत गट नोंदणी केल्याने त्यांची पहिल्याच टप्प्यात स्थायी समितीवर निवड झाली. त्यामुळे त्यांना स्थायी सदस्यपदाची मोठी राजकीय संधी मिळाल्याची चर्चा आहे.
स्थायी समिती ही महापालिकेच्या आर्थिक व धोरणात्मक निर्णयांची प्रमुख समिती मानली जाते. त्यामुळे या निवडींकडे शहरातील राजकीय घडामोडींच्या दृष्टीने महत्त्वाने पाहिले जात आहे.
