प्रभाग सभेत अधिकाऱ्यांच्या असमाधानकारक उत्तरांमुळे सातपूर प्रभाग सभा तहकूब!

 

आठ दिवसांत प्रलंबित समस्या सोडवा, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई; सभापती समाधान देवरे यांचा इशारा

नाशिक मिरर वृत्तसेवा :सातपूर प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत नागरी समस्यांवर वारंवार तक्रारी करूनही त्यांची सोडवणूक होत नसल्याने सातपूर प्रभाग सभेत नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि पथदिवे यांसारखे महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असतानाही संबंधित विभागांचे अधिकारी सभेत समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रभाग सभापती समाधान देवरे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत सभा तहकूब करण्याचे आदेश दिले. तसेच, आठ दिवसांत प्रलंबित समस्या मार्गी न लावल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला.

 

सातपूर प्रभागातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून विविध नागरी समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्यांबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी केल्या जात असून नगरसेवकांकडूनही संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मात्र, तक्रारी करूनही प्रत्यक्षात समस्या सुटत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे.

 

या पार्श्वभूमीवर आयोजित प्रभाग सभेत नगरसेवकांनी प्रलंबित प्रश्नांचा पाढाच वाचला. रस्त्यांची दुरवस्था, अनियमित पाणीपुरवठा, ड्रेनेजच्या समस्या, कचऱ्याचे ढीग, अस्वच्छता आणि बंद पथदिवे यांसारख्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांकडे जाब विचारण्यात आला. मात्र, संबंधित अधिकारी प्रश्नांना ठोस उत्तरे देत नसल्याचे समोर आल्याने सभेतील वातावरण चांगलेच तापले.

 

नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रभाग सभा आयोजित केली जाते. मात्र, सभेतच अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसतील आणि प्रत्यक्ष कामांना गती मिळत नसेल, तर अशा सभांचा उपयोग काय? असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला. केवळ तक्रारी ऐकून घेण्यापेक्षा त्यावर तातडीने कार्यवाही होणे आवश्यक असल्याचे सभापती समाधान देवरे यांनी स्पष्ट केले.

 

अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत सभापती देवरे यांनी संबंधित विभागांना आठ दिवसांची मुदत दिली. या कालावधीत प्रभागातील सर्व प्रलंबित नागरी समस्या मार्गी लावाव्यात, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. आठ दिवसांत समस्यांचे निराकरण झाले नाही आणि नागरिकांना दिलासा मिळाला नाही, तर संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला. अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने त्यांनी सभा तहकूब करण्याचे आदेश दिले.

सभेला नगरसेवक निवृत्ती इंगोले, अमोल पाटील, नितीन निगळ, नगरसेविका इंदुबाई नागरे, सविता काळे, मानसी शेवरे, अंकिता शिंदे, सोनाली भंदुरे, माधुरी बोलकर, उषा बेंडकुळे, कविता लोखंडे, विभागीय अधिकारी सुनील राजभोज यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 

आता आठ दिवसांत प्रशासनाकडून प्रत्यक्ष किती कामे मार्गी लागतात आणि नागरिकांच्या समस्यांना कितपत दिलासा मिळतो, याकडे सातपूरकरांचे लक्ष लागले आहे.

 

Don`t copy text!