पालकमंत्री छगन भुजबळ यांची घोषणा
नाशिक मिरर वेबटीम :
नाशिक जिल्ह्यात ४ जानेवारीपासून ९ वी ते १२ वी च्या शाळा सुरू होणार आहेत, अशी घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी (दि.१९) केली. ग्रामीण भागातील
शाळा प्रत्यक्ष उघडणार असून नाशिकमधील शाळांबाबत मुंबई-पुण्यातील शाळांचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात ना. भुजबळ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीती कोविड-१९ चा आढावा घेतला. या आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले. दिवाळीनंतर रूग्णवाढीची शक्यता वर्तविली जात असताना प्रत्यक्षात मात्र, कोरोनाचा प्रादूर्भाव अटोक्यात आहे. त्यामुळे ४ जानेवारी पासून जिल्ह्यातील शाळा उघडण्याचा निर्णंय बैठकीत घेण्यात आला. ग्रामीण भागातील शाळा पुर्णत: सुरू करण्यात येतील.नाशिक शहरातील शाळांबद्दलचा निर्णय मनपास्तरावर घेण्यात येईल. शहरातील शाळा सुरू करण्यापूर्वी मुंबई-पुण्यातील शाळासंदर्भातील आढावा घेण्याच्या सुचना मनपा प्रशासनाला देण्यात आल्याचे भुजबळांनी सांगितले.शाळा उघडण्यापूर्वी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. तसेच शाळा प्रशासनांनी शाळांची साफसफाई, विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय, हात धुण्यासाठी पाणी, हॅन्ड सॅनिटायझची सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक असेल, असेही भुजबळ यांनी सांगितले. बैठकीत भुजबळांनी कोरोना लसीकरणासंदर्भातील तयारीचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीला जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्यासह आरोग्य, नाशिक व मालेगाव मनपा तसेच पोलीस विभागाचेअधिकारी उपस्थित होते.
