नाशिक मिरर वेबटीम : वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जातात.वाचनसंस्कृती जोपासन्यामध्ये सार्वजनिक वाचनालये, ग्रंथालये यांचा मोलाचा वाटा आहे. मात्र, अनेक कारणांनी सार्वजनिक ग्रंथालयांकडे जाण्यासाठी इच्छा असूनही अनेकजण पाठच फिरविताना दिसतात. गेल्या काही वर्षात डिजिटल स्वरूपात पुस्तके, वर्तमानपत्र किंवा मासिक वाचण्याचा ट्रेंड आहे. नागरिकांची ही आवड विचारात घेऊन आता नाशिकमध्ये सार्वजनिक डिजिटल ग्रंथालय साकारले जावे ज्यामुळे नागरिकांना त्यांच्या वेळेमध्ये वृतपत्र, मासिक, ई-जर्नल किंवा पुस्तक वाचता येणार आहे. या उपक्रमासाठी महाराष्ट्रात नाशिक शहराने पुढाकार घ्यावा यासाठी नाशिक मनपाच्या प्रभाग क्रमांक ९ च्या नगरसेविका प्रा.डॉ.वर्षा भालेराव यांनी मनपा आयुक्त कैलास जाधव यांना निवेदन देऊन केली आहे.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना वाचनाची आवड असते. वाचनामुळे व्यक्तीच्या जीवनात प्रगल्भता येते. चांगले वाचन असणाऱ्या व्यक्ती बहुश्रुत असतात, वाचाल तर वाचाल असे नेहमीच म्हटले जाते. त्यामुळेच वाचनाला विविध संस्थांकडून प्रोत्साहन दिले जाते. त्यासाठी सार्वजनिक वाचनालये तसेच ग्रंथालये चालाविली जातात. मात्र, बहुतांशी सार्वजनिक वाचनालयांची सद्यस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे वाचनाचे प्रमाण कमी होत आहे. हवी असणारी पुस्तके वेळेवर न मिळणे, अनेक महत्वाची आणि दुर्मिळ पुस्तके चांगल्या स्थितीत नसणे आणि सोशल मिडियाचा अतिवापर या सर्वावर जर आपण एकच उपाय किंवा पर्याय देऊ शकलो तर वाचनाची गोड़ी वाढविण्यास त्याची मदत होणार आहे. त्यासाठीच केंद्र सरकारच्या डिजीटल इंडिया आणि स्मार्ट सिटी या योजनाअंतर्गत आता डिजिटल लायब्ररी हा उपक्रम महाराष्ट्रात नाशिक शहरापासून सुरवात करावा व यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी प्रा.डॉ.वर्षा भालेराव यांनी केली आहे.
