नाशिक मिरर वेबटीम :
नॉयलॉन मांजा विक्री करण्यास बंदी असतानाही नाशिक शहर परिसरात बेकायदेशीरपणे मांजा विक्री केला जात आहे. नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करीत पंचवटी पोलिसांनी अशा विक्रेत्यांना कठोर कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे. पंचवटी परिसरातून पोलिसांनी नायलॉन मांजाच्या ११० फिरक्यांचा तब्बल ६८ हजारांचा माल जप्त केला आहे. व विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे. मकरसंक्रातीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडविताना नाशिक शहरात नायलॉन मांजाचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. तसेच, चारच दिवसांपूर्वी हिरावाडी परिसरातील एका महिलेचा नायलॉन मांजाने बळी घेतला आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना नायलॉन मांजाविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. पोलीस उपआयुक्त अमोल तांबे, सहायक पोलीस आयुक्त प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत, पोनि अशोक साखरे यांनी सपोनि मनोज शिंदे, सपोनि सत्यवान पवार यांचे व फुलेनगर चौकीचे अंमलदार यांचे गुन्हेशोध पथक तयार करून शनिवारी (दि.२) धडक मोहीम राबवली. पेठरोड शनिमंदिराजवळील पवन अंडी सेंन्टरवर छापा टाकून येथून बंदी असलेल्या नॉयलान मांजाच्या अंदाजे ६८,५०० रुपये किमतीच्या ११० फिरक्या ताब्यात घेतल्या. दुकान मालक प्रवीण मधुकर मोरे (३०, रा. प्रधाननगर, म्हसोबा मंदिर पाठीमागे, नाशिकरोड) यास ताब्यात घेवून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सपोउनि ठाकरे, हवालदार राजेंद्र शेळके, नाईक संदीप शेळके, संतोष काकड, विलास चारोस्कर, नितीन जगताप, राकेश शिंदे, नारायण गवळी, मनोज खैरे, अविनाश थेटे, गोरक्ष साबळे, सुमित इटोकर, कुणाल पचलोरे, दत्तात्रय बाचकर, श्रीकांत कर्पे, अंबादास केदार यांनी सहभाग नोंदवला.

Don`t copy text!