नाशिक मिरर वेबटीम : आडगांव परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली असून, अनैतिक संबंधामध्ये अडसर ठरणाऱ्या सात वर्षीय बालकाची हत्या करून फरार झालेल्या नराधम प्रियकरास व त्यास मदत करणाऱ्या मुलाच्या निर्दयी मातेस आडगाव पोलिसांनी जेरबंद केले आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. २१ डिसेंबर २०२० रोजी घराबाहेर खेळताना पडून जखमी झालेल्या नांदूरनाका येथील ७ वर्षीय मुलास त्याच्या आईने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषित केले होते. त्यावरुन आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी केलेल्या या मुत्यूच्या चौकशीत अत्यंत संतापजनक प्रकार उघड झाला. संशयित सोमनाथ उर्फ योगेश वसंत कु-हाडे, (२२, रा. साईनगर, नांदुरगाव, नाशिक) याने हा लहान मुलगा त्याच्या प्रेयसीच्या पहिल्या पतीपासून झालेला असून, त्यास त्याचा सांभाळ करावा लागत. तसेच त्याचा प्रेयसीसोबत अनैतिक संबंधात अडसर निर्माण होत होता. म्हणून संशयित योगेश हा लहान मुलास नेहमी कमरेच्या बेल्टने व लाथाबुक्यांनी मारहाण करीत असत. दि. २१ डिसेंबर रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास संशयिताने त्याच्या घरात त्या निष्पाप बालकाचे डोके जोरात भिंतीवर आपटले. यात जखमी झालेल्या त्या लहान मुलास मुलाच्या आईने दुसऱ्या दिवशी (दि.२२) सकाळी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी चुकीचे नाव सांगून दाखल केले होते. यातील संशयित (२४), महिलेने तिचा मुलगा संशयित सोमनाथ वसंत कु-हाडे याने केलेल्या मारहाणीत जखमी झाला आहे, हे माहित असतानाही वैदयकीय अधिकारी यांना गुन्हा लपविण्याच्या हेतूने खोटी माहिती देऊन दाखल केले होते. विशेष म्हणजे पोटचा मुलगा मयत झाल्यानंतरही त्याचा मृतदेह ताब्यात न घेता ती पळून गेली होती. संशयित सोमनाथ उर्फ योगेश वसंत कु-हाडे व महिला संशयित यांच्याविरुध्द आडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. सपोनि तोडकर व डि.बी.पथक व महिला पोलीस अंमलदार यांनी तात्काळ शोध घेवून संशयितांना ताब्यात घेऊन या गुन्ह्याचा छडा लावला. गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख हे करीत आहे. दोन्हीही संशयितांना पोलीस कोठडी मिळणेकामी रविवारी (दि.३) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय, पोलीस उपआयुक्त अमोल तांबे,सहायक पोलीस आयुक्त प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलीस ठाण्याचे वपोनि इरफान शेख, सपोनि एस. तोडकर, पोउनि धैर्यशील घाडगे, सपोउनि दिलीप शिंदे, हवालदार नरवडे, वाढवणे, खुळे, जाधव, सुनिल गांगुडे, विजयकुमार सूर्यवंशी, दशरथ पागी, साबळे, परदेशी, देशमुख, अंबादे, महाले यांनी केली आहे.

Don`t copy text!