आयुक्तांकडून चौकशीचे आदेश

नाशिक मिरर वेबटीम :
मनपाच्या रूग्णालयांसह जिल्हा रूग्णालयातही कोरोना रूग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याचे कारण देत दीपक डाेके नामक सामाजिक कार्यकर्त्याने सिडकाेतील दाेन कोराेनाग्रस्त रूग्णांना महापालिकेत आणून प्रवेशाद्वारावरच ठिय्या आंदोलन केल्याची घटना बुधवारी (दि.३१) घडली. दरम्यान, याप्रकरणाची गंभीर दखल घेत आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले असून, घटना स्टंटबाजी की मनपाला बदनाम करण्याचा कट याबाबतची चौकशी होणार आहे.

        मनपाच्या प्रवेशव्दारावरच रूग्ण आल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. रूग्णवाहिका बाेलावून दाेन्ही रूग्णांना बिटकाे रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आयुक्त कैलास जाधव यांनी दोन दिवसांपूर्वीच शहरातील सरकारी व खासगी रूग्णालयांमध्ये सुमारे नऊशेहून अधिक बेड उपलब्ध असल्याचे सांगितले होते. यामुळे संबधीत दोन्ही रूग्णांना बेड मिळाले नाही का, त्यांनी बेडसाठी मनपाच्या सेंट्रल बेड रिझर्व्हशन सिस्टीमशी संपर्क साधला हाेता का, बेड उपलब्ध करून दिल्यानंतरही रूग्णांना प्रवेशव्दारावर का आणले या सर्व बाबींची सखाेल चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त डाॅ. प्रवीण आष्टीकर यांना दिले आहेत.

        बुधवारी (दि.३१) सायंकाळी दीपक डाेके याने सिडकाेतील कामटवाडे भागात राहणाऱ्या रूग्णाला थेट आॉक्सिजन सिलेंडरसहीत मनपाच्या प्रवेशद्वारावर आणले. रूग्णाच्या शरीरातील आॉक्सिजनचे प्रमाण ३५ टक्के असल्याचे बाेटाला लावलेले आॉक्सीमीटर दाखवत हाेते. रूग्णाला डाॅ. हुसेन तसेच बिटकाे रूग्णालयात बेड न मिळाल्याचा दावा डाेके यांनी केला. जिल्हा रूग्णालयात गेल्यानंतर येथे केवळ ग्रामीण भागातील रूग्णांना दाखल करून घेतले जात असल्याचे सांगत मनपा रूग्णालयाशी संपर्क साधण्यास सांगण्यात आल्याचे डाेके याचे म्हणणे आहे. हा प्रकार सुरू असतानाच डीजीपीनगर भागातील आणखी एका रूग्णालाही मनपात बाेलवण्यात आले. या दाेघांनाही बेड न मिळाल्याची तक्रार करण्यात डोके याने केली.
या घटनेप्रसंगी शिवसेना गटनेता विलास शिंदे व नगरसेवक सुधाकर बडगुजर उपस्थित हाेते. त्यांनी रूग्णांना बेड मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. दोन रूग्णांपैकी आॉक्सिजन सिलेंडर लावलेल्या रूग्णाने मागील तीन दिवस तसेच कोराेना चाचणी करण्यापूर्वी काय व कोठे उपचार घेतले तसेच रूग्णाने आॉक्सिजन सिलिंडर कोठून आणले या बाबींचा चौकशीत शोध घेतला जाणार आहे.

रूग्णांना बेड न मिळणे ही बाब दुदैवी आहे. यासंदर्भात चौकशी केली जाईल. रूग्णांनी बेडसाठी काेठे संपर्क केला ही बाब तपासली जाईल. मात्र शहरातील वातावरण बिघडविण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर संबंधितांवरही कारवाई केली जाईल.
–  कैलास जाधव, आयुक्त, नाशिक

बातम्या

Don`t copy text!