नाशिक मिरर : आजपर्यंतच्या राजकीय, सामाजिक व खाजगी जीवनात जेव्हा जेव्हा महत्वाचे निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा तेव्हा समाजहिताचे लोकाभिमुख निर्णय मी घेतले. ‘त्या’ काळात केलेले स्वतःचे छोटेखानी लग्न, एका मुलीवर थांबण्याचा निर्णय हे त्यापैकीच एक आहे. आतादेखील गुरुवारी (ता. १) माझ्या कन्येचा विवाह साध्या नोंदणी पद्धतीने करावयाचे ठरविले असल्याची माहीती आज सिन्नरचे आ. माणिकराव कोकाटे यांनी नाशिक मिरर सोबत बोलते वेळी दिली.
आपल्या मुलीच्या विवाहाबाबत अधिक माहीती देतांना त्यांनी सांगितले की, माझ्या परिवारातील आजपर्यंत साध्या पध्दतीच्या विवाहाची परंपरा पुढे चालू ठेवण्याचा निर्णय आपण घेतला आहे. जीवनाच्या व्यासपीठावर लग्न कार्य, त्यात होणारा अनाठायी खर्च व तत्सम सामाजिक चालीरीतीवर मी सातत्याने केलेले भाष्य, त्याला वास्तवतेमध्ये न्याय देण्याची वेळ आज माझ्यावर आलेली आहे. ‘सिमंतीनी’ ही माझी कन्या माझ्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात आली. जनतेनेही ती आपलीच ‘लेक’ समजून तिला प्रेम, माया दिली. त्या शिदोरीवरच ती जिल्हा परिषदेत निवडून आली. आता ती विवाहबंधनात अडकत असतांना माझे मन मात्र जनतेच्या प्रेमात अडकले आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार केवळ पन्नास लोकांमध्ये हा विवाह सोहळा करणे माझ्यासाठी तरी शक्य नाही. आयुष्याच्या या वळणावर माझ्या अत्यंत जवळचे मित्र, नातेवाईक, स्नेही, हितचिंतक, कार्यकर्ते यांची संख्या असंख्य आहे, संपूर्ण मतदार संघ माझं कुटुंब आहे, त्यातून पन्नास लोक निवडणे माझ्यासाठी या जन्मी तरी अशक्य आहे. मुळात मुलीच्या लग्नाबाबत माझा निर्णय अत्यंत ठाम होता. मतदार संघातील १५१ मुलींचे लग्न मला माझ्या मुलीच्या लग्नात लावून सामुदायिक विवाह किंवात्याऐवजी साध्या नोंदणी पद्धतीनेच विवाह करण्याची माझी इच्छा होती. पण कोरोनाच्या नियमांची पायमल्ली होवू नये याबाबत लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य आहे. त्यामुळेच आपल्या सगळ्यांच्या आरोग्याच्या जबाबदारीची जाणीव ठेवून कोविडच्या पार्श्वभूमीवर साध्या नोंदणी पद्धतीने हा विवाह करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. जनतेचे कृपाशीर्वाद यापूर्वीही सदैव माझ्या व माझ्या कुटुंबाच्या मागे होतेच तसेच उभयतांच्या पाठीशी देखील सदैव राहतील. या अपेक्षेसह सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ते आम्हापर्यंत निश्चित पोहोचवावे, असे आवाहनही आ. कोकाटे यांनी केले आहे.

