नाशिक मिरर : सातपूर भागात असलेल्या लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गर्दी होत आहे.त्यामुळे कोरोना संसर्ग पसरण्याची शक्यता अधिक असल्याचे दिसून येत आहे.
म्हणून शहरातील लसीकरण केंद्राची संख्या वाढावी यासाठी माजी सभागृह नेते व नगरसेवक दिनकर पाटील यांनी मनपा आयुक्त कैलास जाधव यांना पत्रव्यवहार केला होतो. व पाठपुरावा केला सातपूर भागातील कोरोना मुक्त सातपूर करण्याच्या उद्देशाने सातपूर भागातील सर्व नागरिकांना लसीकरणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी नगरसेवक दिनकर पाटील आणि युवा उर्जा फाऊंडेशनचे अध्यक्ष अमोल पाटील यांनी प्रभाग क्रमांक ९ मध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराज मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय कार्बन नाका येथील मनपाने बांधलेल्या नूतन शाळा इमारतीत लसीकरण केंद्र सुरू करावे, व त्यासाठी आवश्यक त्या भौतिक सुविधा युवा उर्जा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून देऊन सदरचे लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला.
त्यास मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी परवानगी दिली असून, त्यानुसार सदर ठिकाणी नाशिक महानगरपालिका व युवा उर्जा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य कोविड लसीकरण केंद्र बुधवार दिनांक ३० जून रोजी सकाळी १० वाजे पासुन सुरू करण्यात येणार आहे.त्यामुळे सातपूर भागातील गंगापूर ,धृवनगर ,शिवाजीनगर,सोमेश्वर कॉलनी, कामगार नगर ,अशोक नगर ,श्रमिक नगर भागातील जनतेसाठी जवळ लसीकरण केंद्र उपलब्ध होणार आहे.सदर ठिकाणी २०० खुर्च्या, २ संगणक, वायफाय सुविधा, आवश्यक ते मनुष्यबळ नियोजन, व्यवस्थापन, जनजागृती करणे आदि सुविधा युवा ऊर्जा फाऊंडेशन ही समाजसेवी संस्था जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून देणार असल्याने सदर लसीकरण केंद्र सुरू करण्यात येत असल्याचे मनपा वैदयकीय अधिकारी यांनी सांगितले.
