जागरुक नागरिकांच्या तक्रारीची मनपाने घेतली दखल

नाशिक मिरर :
नाशिक मनपाच्या वतीने सातपूर विभागात सुरु असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाची अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांनी पाहणी करत कामातील दर्जा तपासला. मनपाच्या वतीने सुरु असलेली ही कामे निकृष्ट दर्जाची सुरु असून केवळ अधिकारी व ठेकेदार यांच्या आर्थिक हितसंबंधातून सुरु असल्याचा आरोप परिसरातील काही जागरूक नागरिकांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर आज (दि.27) अतिरिक्त आयुक्तांनी हा पाणी दौरा केला.

 

नाशिक मनपाच्यावतीने सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक 9, 10 व 26 मध्ये मेसर्स सोनजे असोसिएट या ठेकेदारमार्फत रस्ता रुंदीकरणाची कामे झपाट्याने सुरू आहे. मात्र ही कामे दर्जाहिन, निकृष्ट असल्याचा आरोप स्थानिक नागरिक गणेश मेहेत्रे व कमलाकर ह्याळीज या नागरिकांनी केला असून थेट मुख्यमंत्र्यांसह, सार्वजनिक बांधकाम, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. याची दखल घेत आज मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांनी घटनास्थळी भेट देत सुरु असलेल्या कामाची पाहणी करत कामाचा दर्जा तपासला. यावेळी त्यांच्यासमवेत कार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील, सातपूर मनपा बांधकाम उपअभियंता डी.एस. कोल्हे, शाखा अभियंता संजय घोलप, मेसर्स सोनजे असोसिएटचे संचालक प्रशांत सोनजे, तक्रारदार नागरिक कमलाकर ह्याळीज, गणेश मेहेत्रे आदी उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी सुरु असलेल्या रस्त्याच्या कामात 14 इंच खडीच्या लेयर ऐवजी काही ठिकाणी 6-8 इंच खडीचा लेयर आढळून आला. साईड पट्टी कोरल्यानंतर त्या ठिकाणी प्रथम दगड व त्याखाली मुरूम आवश्यक असताना थेट काळी माती आधळून आल्याने सुजाण नागरिकांनी केलेल्या आरोपांमध्ये काही अंशी तथ्य आढळून आले.

 

दरम्यान, यावेळी अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांच्या समोरच मेसर्स सोनजे असोसिएटचे संचालक प्रशांत सोनजे व तक्रारदार नागरिक कमलाकर ह्यालिज यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. अतिरिक्त आयुक्त खाडे यांच्या मध्यस्थीनंतर वाद निवळला. यावेळी अतिरिक्त आयुक्त खाडे यांनी अधिकारी व ठेकेदाराच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत त्यांना मुख्य कार्यालयात हजर राहण्यास सांगीतले.

हा खड्डा बुजवू नये
रस्ता रुंदीकरणाच्या कामाची पाहणी करताना अतिरिक्त आयुक्त खाडे यांच्यासमोर अर्धवट तयार झालेला रस्ता खोदण्यात आला. दरम्यान हा खड्डा काम पूर्ण होईपर्यंत बुजवून नये. संपूर्ण डांबरीकरण झाल्यानंतर या कामाचा दर्जा तपासूनच हा खड्डा बुजवण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त खाडे यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना दिला.

बातम्या

Don`t copy text!