दरवर्षी २० टक्के बोनस ; दुप्पट ग्रॅज्युटीसह सेवानिवृत्तीनंतरही ७५ वर्षापर्यंत कुटुंबाचा मेडिक्लेम
नाशिक मिरर : कोरोना महामारीच्या काळात एकीकडे कामगार कपात, वेतन कपात सुरू असताना दुसरीकडे अंबड औद्योगिक वसाहतीतील लीग्रँड कंपनीत ऐतिहासिक करार करत कंपनी व्यवस्थापन युनियन प्रतिनिधींनी सकारात्मकतेचे दर्शन घडवले आहे. नवीन करारनुसार कामगारांना ११ हजार ५५० रुपयांची वेतन वाढ देण्यात आल्याने कामगारांच्या हातात दरमहा ६० हजार ७०० रुपये वेतन पडणार आहे.
अंबड औद्योगिक वसाहतीत नोवातीयार इलेक्ट्रिकल अँड डिजिटल सिस्टम (लीग्रँड) कारखाना आहे. कंपनी कामगारांनी १९९६ पासून सिटू संलग्न नाशिक वर्कर्स युनियनचे प्रतिनिधित्व स्वीकारले आहे. गेल्या २६ वर्षात अनेक करार झाले असून हा करार मात्र ऐतिहासिक ठरला आहे. नवीन करारानुसार कामगारांना ११५५० रुपये वेतनवाढ मिळणार आहे, सात रुपये पर पॉईंट या दराने महागाई भत्ता मिळणार आहे, दरवर्षी २० टक्के बोनस (सुमारे ७६ हजार रुपये) पूर्ण बेसिक डीएवर दिला जाणार आहे, ग्रॅज्युटीमध्ये दुप्पट वाढ करण्यात आली असून, सेवानिवृत्तीनंतरही ७५ वर्षापर्यंत कामगाराच्या कुटुंबाची मेडिक्लेम सुविधा सुरु ठेवत सेवानिवृत्त कामगारांच्या आरोग्याची काळजी युनियन व व्यवस्थापनाने घेतली आहे. कामगारांना टर्म लाइफ इन्शुरन्स योजना लागू करण्यात आली असून कामगारांना वार्षिक वेतनाच्या तीन पट रक्कम मिळणार आहे.
दरम्यान, कोरोना महामारी, लॉक डाउन यात औद्योगिक क्षेत्र अडकल्यामुळे गेल्या तेवीस महिन्यांपासून कंपनी व्यवस्थापन व युनियन प्रतिनिधी यांच्यामध्ये या करारावर चर्चा सुरू होती. अखेर सकारात्मक भूमिकेमुळे हा करार नुकताच संमत करण्यात आला आहे. एक जुलै २०१९ पासून तीन वर्षासाठी हा करार लागू करण्यात आला आहे. वेतनवाढीच्या फरका पोटी कामगारांना सुमारे सव्वा लाख रुपये प्रत्येकी मिळणार आहे. कामगारांनीही नऊ टक्के उत्पादन वाढ देण्याचे मान्य केले आहे. करारावर सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्याध्यक्ष डॉ. डी.एल. कराड, नाशिक वर्कर्स युनियचे सरचिटणीस सिताराम ठोंबरे, उपाध्यक्ष तुकाराम सोनजे, कमिटी मेंबर सोपान पवार, खुशाल चौधरी, संजीव अहिरराव, वेणीलाल पवार, किशोर रोकडे तर कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट नितीन महाजन, जनरल मॅनेजर अभय खरे, एच आर नितीन शिंदे आदींनी सह्या केले आहे. कोरोना महामारीत सर्वत्र नैराश्याचे वातावरण असताना अंबडच्या लीग्रँड कंपनीने कामगारांना मात्र सुखद धक्का दिला आहे.
सर्व कामगारांना प्रोत्साहन भत्ता
लॉक डाऊन काळात ज्या कामगारांनी काम केले आहे. त्या कामगारांना फेब्रुवारी महिन्यातील पगाराच्या ३५ % वेतन देण्यात आले आहे. हे वेतन कायम कामगारांसह हंगामी कामगार (कॉन्ट्रॅक्ट) व सिक्युरिटी कामगारांनाही देत इतर कारखान्यांसमोर आदर्श उभा केला आहे.
१० यशस्वी करार
कोरोना या महामारीच्या काळात अनेक उद्योगांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले आहे. अशा बिकट परिस्थितीत कामगार व व्यवस्थापन यांच्यात यशस्वी मध्यस्थी करत, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नाशिक वर्कर्स युनियनने वेगवेगळ्या कारखान्यात दहा यशस्वी करार केले आहे. उद्योगांनी कामगारांना पेन्शन द्यावी यासाठीही प्रयत्न सुरू असून अनेक उद्योजक यासाठी सकारात्मक दिसून येत आहे
– डॉ. डी. एल. कराड, राष्ट्रीय उपाध्यक्ष, सिटू

