नाशिक मिरर :
सासरचा शारीरिक व मानसिक छळ असह्य झाल्याने विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तिचा मृत्यू संशयास्पद झाला असून, सासरची मंडळी तिच्या मृत्यूला कारणीभूत आहेत, असा आरोप विवाहितेच्या आई, वडिलांसह नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी विवाहितेच्या वडिलांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती अमित एकनाथ शिंदे (सर्वजण सध्या रा. राजगुरुनगर, जि. पुणे), मूळ गाव मोड (ता. तळोदा, जि. नंदुरबार), सासरे एकनाथ विठ्ठल शिंदे, सासू सीमा एकनाथ शिंदे व दीर सुमित
एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. साक्षी अमित शिंदे (वय २३) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ५ फेब्रुवारी २०१८ ते १७ जून २०२१ या कालावधीत सासरच्या मंडळींनी साक्षी शिंदे हिचा शारीरिक व मानसिक छळ केला. तिचा विवाह तीन वर्षांपूर्वी आतेभाऊ अमितशी झाला होता. ती सासरी राजगुरुनगर येथे नांदत होती. दोन वर्ष पती कोणताही कामधंदा करत नव्हता. तिचा सासरच्या मंडळींकडून छळ सुरु होता. मात्र, तिने छळ सहन केला. तिची तब्येत खालावल्याने आईवडिलांनी तिला माहेरी नाशिकला आणले.
त्यावेळी सासरी होणारा छळ वडिलांना सांगितला. सासू शारीरिक व मानसिक छळ करत आहे तर सासरे लैंगिक छळ करत असल्याचे तिने वडिलांना सांगितले. तिने पती व सासूकडे सासऱ्यांविरुद्ध तक्रार केली. पण दुर्लक्ष केले गेले. सासरच्यांनी माहेरून पैसे आणण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला. विवाहितेस थायरॉईड आजार असल्याचे ती गर्भवती राहू शकत नाही, असा गैरसमज करुन घेत सासरच्यांनी छळ केला. स्वयंपाक येत नाही, असे टोमणे सासूने मारुन तिला घरकाम करताना जाणीवपूर्वक जास्त काम करुन घेतले जात होते. तिला धीर दिला नाही. तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. त्यातून तिने १७ जून २०२१ रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
