नाशिक मिरर : नाशिक शहरातील गजबजलेल्या गोंगाटापासून दूर निसर्गाच्या सान्निध्यात ग्रामीण संस्कृतीला साजेशे घर किंवा बंगला बांधायचा व विकेंड साजरा करण्यासाठी महिन्यातून कधीतरी कुटुंबासह तेथे मौजमजा करायची यासाठी बांधलेले फार्महाऊस इतरवेळा हे मित्र किंवा इतरना भाड्याने देऊन त्यातून ‘माया जमविण्याचा उद्योग काही मंडळींकडून केला जात आहे. या फार्म हाउसचा वापर कशासाठी होतो याकडे मालकांकडून जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जाते. इगतपुरी,घोटी ,त्रंबकेश्वर परिसरात निर्जनस्थळी असे अनेक फार्म हाउस नजरेस पडत आहेत. अशा फार्महाऊस वर अवैध व्यवसाय व रेव्ह पार्टी अशा प्रकार सर्रास सुरू आहे.असे फार्महाऊस व हॉटेल व्यवसायिक यांच्या वर कारवाई करण्याची मागणी छावा क्रांतिवीर विद्यार्थी सेनेचे प्रदेश अध्यक्ष उमेश शिंदे यांनी केली आहे. यावेळी शिवाजी मोरे प्रदेश महासचिव ,विजय खर्जुल जिल्हाप्रमुख नाशिक उपस्थित होते.

सदर फार्म हाऊसला अधिकृत परवानगी नसून देखील फार्महाऊस परवानगी न घेता बांधकाम करून सुरू असल्याचेही निदर्शनास येत आहे. याठिकाणी कोणत्या प्रकारचे अवैध व्यवसाय चालतात हे नुकतेच इगतपुरी येथील रेव्ह पार्टी प्रकरणावर झालेल्या पोलीस कारवाईतून समोर आले आहे.

अनेकांनी दूर अंतरावर निसर्गाच्या सान्निध्यात फार्म हाउस बांधली आहेत. स्थानिक एजंटांच्या मदतीने आर्थिक अडचणीत सापडलेल्या एखाद्या ग्रामस्थाची जमीन कवडीमोल दराने विकत घ्यायची आणि तेथे आलिशान फार्म हाउस बांधायची स्पर्धा सध्या सुरू आहे.व्यक्तीगत अथवा व्यवसायिक हेतूने फार्म हाऊस बांधण्यास विरोध करण्याचा कुठलाच हेतू नाही.किंबहूना वीकेंड साजरा करणे अथवा आपल्या कुटुंबीयांना आठवड्यातील काही दिवस शांतपणे घालवता यावेत यासाठी या फार्महाउसचा वापर होत असेल तर त्यालाही आक्षेप घेण्याचे कारण नाही.

तथापी, यातील काही फार्म हाऊस केवळ अवैध धंदे चालविण्यासाठी वापरले जात आहेत. सर्वच फार्म हाउसवर अवैद्य व्यवसाय होत आहे असे नाही मात्र.अनेक फार्म हाउस केवळ अशा मौजमजेसाठी वापरली जात आहेत .नागरी वस्तीपासून दूर असलेल्या फार्म हाउसवर नेहमीच उच्चभ्रू व्यक्तींच्या आलिशान गाड्यांचा राबता असतो. काही फार्म हाउस तर जुगाराचे अड्डेच बनले आहेत. शहरातील काही व्यावसायिक सुटीच्या दिवशी नेहमी अशा ठरलेल्या अड्ड्यांवर जमा झालेले असतात. तिथे रुपयांचा नव्हे तर लाखांचे डाव खेळले जातात. अशा अड्ड्यांवर अनेकवेळा वादावादीचे प्रसंग घडतात. पण त्यावर कारवाई काहीच होत नाही. अशा वादांची कधीही पोलिस दप्तरी नोंद झाल्याचे उदाहरण नाही. केवळ जुगारच नाहीतर वाढदिवस पार्टीच्या नावाखाली लेझर शोच्या प्रकाशात अल्पवयीन युवतींना नाचवले जाते. काही ठिकाणी खुलेआम वेश्या व्यवसाय केला जात असल्याचे किळसवाणे प्रकारही चर्चेत आहेत. फार्म हाउसच्या मालकांना राजकीय वरदहस्त लाभल्याने कारवाई होत नाही म्हणून ग्रामस्थही वैतागले आहेत. त्यात भरीस भर म्हणून लॉजिंग-बोर्डिंग अशा ठिकाणी वेश्याव्यवसाय,तसेच प्रेमप्रकरणातून अनैतिक संबंधांना प्रोत्साहन दिले जात असल्याचे पहायला मिळते. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी ,हा परिसर धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असून देशातून अनेक वारकरी,भाविक भक्त या ठिकाणी येत असतात. अशा भाविक भक्त पर्यटकांची राहण्याची सोय व्हावी म्हणून या व्यवसायाला मान्यता दिली असताना अवैधपणे धंदे करणाऱ्या लॉजिंग बोर्डिंगने या व्यवसायाचे स्वरूप पूर्णपणे बदलून टाकले आहे. वेश्याव्यवसाया सह प्रेमप्रकरणातील अनैतिक संबंधांसाठी लॉजचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे.ऑनलाईन सेक्स रॅकेट हे जाळ देखील मोठ्या प्रमाणात पसरले असून त्यांच्याकडून देखील अशा जागांचा वापर होत आहे. त्यामुळे सदर फार्महाऊस व हॉटेल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

बातम्या

Don`t copy text!