नाशिक मिरर वृत्तसेवा :

नाशिकच्या बांधकाम क्षेत्रातील एक उदयोन्मुख आणि कष्टाळू उद्योजक म्हणून ओळखले जाणारे ‘रोशन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स’चे प्रमुख, इंजि. रितेश संतोष जगताप यांना राज्यस्तरावरील ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉन २०२५’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘रीसेल डॉट इन’ (Resale.in) आयोजित एका भव्य सोहळ्यात प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते त्यांना हा बहुमान प्रदान करण्यात आला.

शून्यातून विश्व निर्माण करणारा प्रेरणादायी प्रवास

रितेश जगताप यांचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. मूळचे नाशिक तालुक्यातील गंगाव्हारे गावचे रहिवासी असलेले त्यांचे वडील श्री. संतोष दादा जगताप यांनी सन २००० मध्ये शेती सांभाळत जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवसायात पाऊल ठेवले. तब्बल १६ वर्षांच्या खडतर मेहनतीनंतर, २०१६ मध्ये त्यांनी ध्रुव नगर परिसरात ४ रो-बंगलोचा पहिला यशस्वी प्रकल्प पूर्ण करत ‘रोशन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स’ची मुहूर्तमेढ रोवली. वडिलांच्या याच कष्टाचा वारसा पुढे चालवताना रितेश यांनी केवळ तो जपला नाही, तर त्याला आधुनिकतेची जोड दिली.

तांत्रिक ज्ञानाची जोड आणि व्यावसायिकता

रितेश जगताप यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचे शास्त्रशुद्ध शिक्षण पूर्ण केले आहे. केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता, त्यांनी ‘चुंभळे बिल्डर्स’चे श्री. संपत चुंभळे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्षे साईट सुपरवायझर म्हणून काम केले. या अनुभवामुळे त्यांना बांधकामातील सूक्ष्म तांत्रिक बाबी, स्ट्रक्चरल मजबुती आणि गुणवत्ता नियंत्रणाची सखोल जाण प्राप्त झाली. गेल्या चार वर्षांपासून व्यवसायाची धुरा समर्थपणे पेलताना त्यांनी आपल्या प्रकल्पांमध्ये आधुनिक डिझाइन आणि दर्जेदार साहित्याचा वापर करण्यावर भर दिला आहे.

गुणवत्ता आणि विश्वास हीच यशाची गुरुकिल्ली

आजघडीला ‘रोशन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स’ने सहा मोठे प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले असून, अनेक नवीन प्रकल्प सध्या पाइपलाइनमध्ये आहेत. स्वतः इंजिनिअर असल्यामुळे प्रत्येक प्रकल्पाच्या तांत्रिक गुणवत्तेवर त्यांचे बारीक लक्ष असते. “हा पुरस्कार म्हणजे केवळ माझा सन्मान नसून, माझ्या वडिलांच्या मेहनतीचे फळ आणि माझ्या ग्राहकांनी माझ्यावर दाखवलेल्या अढळ विश्वासाची पोचपावती आहे,” अशा भावना रितेश जगताप यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केल्या.

​नाशिकच्या मातीतून उभा राहिलेला हा तरुण उद्योजक आपल्या गुणवत्तापूर्ण कामाच्या जोरावर आज महाराष्ट्राच्या नकाशावर ठळकपणे झळकत आहे. त्यांच्या या यशाबद्दल नाशिकच्या व्यावसायिक, सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बातम्या

Don`t copy text!