नाशिक मिरर वृत्तसेवा :

शहरासह देशभरात जलस्रोत संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणाऱ्या संत निरंकारी मिशनच्या ‘प्रोजेक्ट अमृत’ उपक्रमाचा चौथा टप्पा रविवारी यशस्वीपणे पार पडला. स्वच्छ जल, स्वच्छ मन या संकल्पनेवर आधारित या अभियानांतर्गत देश-विदेशातील सुमारे १५०० जलस्रोतांवर एकाच दिवशी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

नाशिकमध्ये पंचवटी परिसरातील रामकुंड व गोदावरी नदी घाट परिसर स्वच्छ करण्यावर विशेष भर देण्यात आला. सकाळी लवकरच निरंकारी सेवादलाचे स्वयंसेवक, महिला भगिनी व भाविक मोठ्या संख्येने एकत्र आले. सुमारे ५०० हून अधिक स्वयंसेवकांनी नदीकाठ, घाट परिसर आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करून नागरिकांसमोर आदर्श निर्माण केला.

या उपक्रमाचे उद्घाटन नाशिक महानगरच्या महापौर सौ. हिमगौरी ताई आहेर-आडके यांच्या हस्ते झाले. सेक्टर संयोजक गुलाब पंजवाणी यांनी अभियानाची भूमिका स्पष्ट करत जलसंवर्धन हे केवळ प्रशासनाचे नव्हे तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे नमूद केले. महापौरांनीही पर्यावरण रक्षणासाठी अशा सामाजिक उपक्रमांची गरज अधोरेखित केली.

गोविंदनगर, पंचवटी, सातपूर आणि जेलरोड शाखांतील निरंकारी बांधवांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला. स्वच्छता उपक्रमानंतर यशवंतराव पटांगण येथे भक्तिमय वातावरणात सत्संग कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

जलसंवर्धनासोबतच सामाजिक जागरूकता वाढविणाऱ्या या उपक्रमाचे शहरात सर्वत्र स्वागत होत असून, ‘प्रोजेक्ट अमृत’मुळे पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला बळ मिळत असल्याचे मत व्यक्त होत आहे.

बातम्या

Don`t copy text!