नवी दिल्ली / मुंबई : नाशिक मिरर वृत्तसेवा
मध्यपूर्वेत वाढत असलेल्या संघर्षाचा परिणाम आता भारतातील इंधन दरांवरही दिसू लागला आहे. पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थिती आणि जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ केली आहे.
सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) यांनी 7 मार्चपासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ केली आहे. या दरवाढीनंतर 14.2 किलो वजनाच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत मुंबईत 852.50 रुपयांवरून 912.50 रुपये इतकी झाली आहे.
दरम्यान, 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 115 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये व्यावसायिक सिलिंडरचा दर 1,720.50 रुपयांवरून 1,835 रुपये इतका झाला आहे.
विशेष म्हणजे एप्रिल 2025 नंतर घरगुती एलपीजीच्या दरात पहिल्यांदाच मोठी वाढ करण्यात आली आहे. या निर्णयाचा थेट परिणाम सर्वसामान्य कुटुंबांच्या स्वयंपाकघराच्या बजेटवर होणार असून, हॉटेल, रेस्टॉरंट आणि एलपीजीवर अवलंबून असलेल्या इतर व्यावसायिक आस्थापनांच्या खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे.
मध्यपूर्वेतील संघर्षाचा परिणाम
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात वाढलेल्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अनिश्चितता निर्माण झाली आहे. विशेषतः पश्चिम आशियातील तेल वाहतुकीचे महत्त्वाचे मार्ग धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ऊर्जा पुरवठा सुरळीत राहील – सरकार
दरम्यान, भारतातील ऊर्जा पुरवठ्याबाबत सरकारने नागरिकांना दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की देशातील ऊर्जा आणि इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत आणि सध्या घाबरण्याचे कोणतेही कारण नाही.
