गणेशनगर येथील जलकुंभ जीर्ण अवस्थेत; नागरिक त्रस्त 

 नाशिक मिरर वृत्तसेवा :

परिसरातील पाईप लाईन रोड,गणेशनगर येथे असलेल्या जलकुंभाची अवस्था अत्यंत जीर्ण झाली असून गेल्या अनेक वर्षांपासून या जलकुंभाची योग्य देखभाल व दुरुस्ती न झाल्यामुळे तो धोकादायक स्थितीत पोहोचला आहे.नगरसेविका अंकिता शिंदे यांनी या जलकुभाची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली असता अनेक समस्या दिसून आल्या.

             सातपूर गणेशनगर येथील हा जलकुंभ १९९९ मध्ये बांधण्यात आला असून गणेशनगर, सुयोग कॉलनी, काळे नगर आणि गुलमोहर कॉलनी या परिसरांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र सध्या या जलकुंभातून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्याचबरोबर जलकुंभाच्या भिंतींना अनेक ठिकाणी तडे गेले असून काही ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे जलकुंभातून सतत पाणी गळत असल्याचेही दिसून येत आहे.

या समस्येची माहिती मिळताच नगरसेविका अंकिता शिंदे यांनी संबंधित ठिकाणी भेट देऊन जलकुंभाची पाहणी केली. जलकुंभाची दयनीय अवस्था झाली आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देत लवकरात लवकर दुरुस्ती करण्याचे आदेश दिले.

याशिवाय जलकुंभावर जाण्यासाठी असलेला लोखंडी जिना देखील मोडकळीस आला आहे. त्यामुळे जलकुंभावर चढणे धोकादायक झाले असून तो कधीही कोसळण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. जलकुंभाची वेळेत दुरुस्ती न झाल्यास मोठा अपघात होण्याची भीती परिसरातील नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, जलकुंभाच्या परिसरात पाणीपुरवठ्याचे जुने व जीर्ण झालेले पाईप देखील टाकून दिलेले दिसून येत आहेत. या ठिकाणी सर्प, विंचू यांसारख्या प्राण्यांचा वावर वाढल्याने नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. तसेच परिसरात अस्वच्छता पसरल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

या सर्व परिस्थितीमुळे महापालिका प्रशासनाने तातडीने जलकुंभाची दुरुस्ती करावी, परिसरातील जीर्ण पाईप हटवून स्वच्छता मोहीम राबवावी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्या अशी मागणी नागरिकांनी होत आहे

 

गणेश नगर परिसरातील जलकुंभाची अत्यंत दुरावस्था झाली आहे.संपूर्ण जिना तुटलेला आहे. पाणी गळतीमुळे जलकुंभ पुर्ण क्षमतेने भरत नाही.नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.या समस्येचे निवारण झाले नाही तर आयुक्ताकडे तक्रार करणार आहे.

-अंकिता शिंदे नगरसेविका

बातम्या

Don`t copy text!