नाशिक मिरर : सिन्नर
नाशिक – पुणे महामार्गावर येथील हॉटेल शाहूसमोर शुक्रवारी (दि.20) रात्री अकरा वाजेच्या सुमारास स्विफ्ट कारने मागून जबर धडक दिल्याने मोटारसायकलवरील दोघे मित्र ठार झाले.
साजन भगवान वायचळे (24) आणि सचिन किसन गोळेसर (23, दोघे रा. कुंदेवाडी, ता. सिन्नर) अशी मृत मित्रांची नावे आहेत. एका मित्राचा वाढदिवस साजरा झाल्यानंतर बजाज पल्सल मोटारसायकलने (एमएच 15 इएन 1450) ते उद्योगभवन परिसरातील हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी जात होते, असे सांगण्यात येत आहे. गतिरोधक असल्याने मोटारसायकलचा वेग कमी केला. तथापि मागच्या बाजूने भरधाव येणाऱ्या स्विफ्ट कारने (एमएच 15 इ 7580) मोटारसायकलला जोरदार धडक दिली. त्यात दोघेही शंभर फुटांपेक्षा अधिक अंतरावर फेकले गेले व गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने नाशिक येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. स्विफ्ट कारचालक जखमी झाला असून त्याला नाशिक येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आल्याचे पोलिस म्हणाले.
साजन वायचळे हा मुसळगाव येथील औद्योगिक सहकारी वसाहतीतील प्रसिद्ध हॉटेल अंबिका खानावळचे मालक भगवान वायचळे यांचा मुलगा होता. तर सचिन गोळेसर हा कुंदेवाडी येथील कीर्तनकार हभप एकनाथ महाराज गोळेसर यांचा पुतण्या होता. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
