सध्या बनावट फेसबुक अकाउंट उघडून नामवंत व्यक्ती किंवा कुठल्याही व्यक्ती असतील त्यांच्या नावाने पैसे मागण्याचे प्रकार सुरू आहेत. याबाबत अनेक तक्रारी सायबर विभागाने नोंदविण्यात देखील आल्या आहेत. मात्र, आपल्या प्रोफाईलवरून आपले देखील बनावट फेसबुक खाते उघडले तर नेमकं काय करायचं? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
नेमकी कशी होते फसवणूक?
नामवंत डॉक्टर, वकील, व्यावसायिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी व नामवंत व्यक्तींचे फेक फेसबुक अकाउंट उघडून त्यांच्या फ्रेण्ड लिस्टमधील मित्र-मैत्रिणी तसेच नातेवाईक यांना सदर फेक फेसबुक अकाउंटवरून फ्रेण्डरिक्वेस्ट पाठविली जाते. सुरुवातीला काही दिवस चॅटिंग सुरू राहते. त्यानंतर विश्वास संपादन केल्याचे लक्षात येताच फेक अकाउंटवरून पैशाची अत्यंत गरज असल्याचे भासवून तशी मागणी संबंधितांकडे केली जाते. संबंधित व्यक्ती पैसे पाठविण्यासाठी ऑनलाइन व्यवस्थेचा वापर करण्यास सुचवितात. पैसे येईपर्यंत अकाउंट सुरू ठेवले जाते. शहरातील अनेक मोठ्या व्यक्तींकडून लाखो रुपये लुबाडले गेले. त्यापैकी काहींनी असे प्रकार वारंवार घडत असल्याचे लक्षात घेऊन सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
बनावट फेसबुक अकाऊंट तयार केल्यानंतर काय करावे?
ज्यांचे बनावट फेसबुक अकाउंट तयार केले असतील त्यांनी आपल्या स्वतःच्या ओरीजनल अकाउंटवरून बनावट प्रोफाईल शोधावी. तुम्हाला शोधता येत नसेल तर ज्या मित्रांना त्या प्रोफाईलवरून रिक्वेस्ट गेली आहे त्यांच्याकडून प्रोफाईलची लिंक मागावी. त्या बनावट प्रोफाईलवर गेल्यानंतर उजव्या बाजूला तीन डॉट दिसतील त्यावर क्लिक करावे. त्यामध्ये Find support or Report profile हे ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करावे. Pretending To Be Someone हे पहिला ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. पुढे तीन ऑप्शन दिसतील, Me, A Friend आणि Celebrity. आपण आपलीच बनविलेली फेक प्रोफाईल रिपोर्ट करत असल्याने त्यापैकी Me हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि Next करा, फेक प्रोफाईल अकाउंट काही वेळाने बंद होईल.
‘फेसबुक’च्या अकाउंटची ‘घरवापसी’
जर तुमचे फेसबुकचे अकाउंट कोणी हॅक करण्याचा प्रयत्न केला असेल, तर ते पुन्हा तुमच्या नियंत्रणाखाली आणणे फारच सोपे आहे. खालीलप्रमाणे कृती केल्यास फेसबुक अकाउंट पुन्हा वापरण्यायोग्य होऊ शकते.
Facebook.com/hacked या लिंकवर जा. तेथे एक बटन दिसेल, ज्यावर My account has been Compromised असे लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर एक स्क्रीन समोर येईल. तेथे पासवर्ड देऊ नका. त्यानंतर Forgotten your passwordवर क्लिक करा.
आता जी स्क्रीन येईल, त्यावर यूजरनेम अथवा ई-मेल किंवा तुमच्या अकाउंटशी जोडलेल्या मोबाइल क्रमांक या तिन्हीपैकी एकाची माहिती द्या. जर हॅक करणाऱ्याने ई-मेल आणि मोबाइल क्रमांक बदलला असेल, तर तुम्ही यूजरनेम टाका. कारण हॅकर यूजरनेम बदलूच शकत नाही.
त्यानंतर फेसबुक तुमच्या अकाउंटला सर्च करून समोर आणेल. आता पासवर्डच्या जागी हॅक करण्यापूर्वीचा किंवा त्या आधीचा पासवर्ड टाका. त्यानंतर तुम्हाला नवीन पासवर्ड टाकण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल.
आता स्क्रीनवर एकापेक्षा अधिक ई-मेलचे पर्याय दिसून येतील. त्यानंतर त्यापैकी कोणत्या ई-मेल आयडीचा वापर करून तुम्ही अकाउंट चालू ठेवणार आहात, या विषयी विचारणा करण्यात येईल. त्यापैकी एक ई-मेल निवडल्यानंतर अन्य ई-मेलमधून तुमचे फेसबुक अकाउंट लॉग इन करण्याची सुविधा काढून घेतली जाईल. त्यानंतर तुम्ही निवडलेला एक ई-मेल आणि नव्या पासवर्डच्या मदतीने फेसबुक पुन्हा कार्यरत ठेवू शकाल.
फेसबुकद्वारा अकाउंट सर्च करून सर्व माहिती समोर आणल्यानंतर जर तुम्ही पासवर्ड देऊ इच्छित नसाल, तर कोणताही पर्याय निवडू नका. तुम्ही फक्त No longer have access to these?वर क्लिक करा. त्यानंतर I can n0t access my email account वर क्लिक करा.
त्यानंतर फेसबुककडून How can we reach you? अशी विचारणा करण्यात येईल. त्यानंतर तुम्ही ई-मेल किंवा मोबाइल नंबर द्या. जेणेकरून फेसबुककडून तुम्हाला लिंक पाठविण्यात येईल. त्यानतंर तुम्ही पासवर्ड पुन्हा रिसेट करू शकता. त्यासाठी तुम्ही कोणत्याही परिचिताच्या ई-मेल किंवा मोबाइलच्या क्रमांकाचा उपयोग करू शकता. त्यानंतर व्यक्तिगणिक फेसबुकचा व्यवहार बदलतो. फेसबुकतर्फे विचारण्यात येणाऱ्या प्रश्नाची कल्पना करू शकत नाही. तुम्ही आतापर्यंत फेसबुकवर केलेल्या अॅक्टिव्हिटिजवर आधारीत प्रश्न विचारले जाऊ शकतात. जर तुम्ही त्या प्रश्नांची खरी आणि योग्य उत्तरं दिली तर काही मिनिटांत किंवा काही तासांत तुम्ही दिलेल्या ई-मेल किंवा मोबाइल क्रमांकावर नवीन पासवर्ड पाठवला जातो.
दुर्घटना से देर भली..
अकाउंट हॅक झाल्यानंतर करावा लागणारा दीर्घ द्राविडी प्राणायाम टाळायचा असेल, तर तीन गोष्टींचा कायम अवलंब करा. पहिली गोष्ट म्हणजे लॉग इन करताना मोबाइल व्हेरिफिकेशन करा. (सेटिंगमध्ये जाऊनही हे काम करता येऊ शकते.) दुसरी गोष्ट म्हणजे अकाउंटचा पासवर्ड कधीही सेव्ह करू नका. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या फ्रेंडलिस्टमधील एका व्यक्तीला तुमच्या अकाउंटचा वारसदार बनवून टाका आणि ही माहिती फेसबुकला कळवा. हे देखील सेटिंगमध्ये जाऊन करता येते. त्यानंतर लॉग इन करताना मोबाइलवर आलेला कोड स्क्रीनच्या खालील मोकळ्या जागेवर टाका. जर संबंधित मोबाइल तुमच्याच जवळ असेल, तर दुसरी कुणीही व्यक्ती त्याचा गैरवापर करू शकणार नाही. फेसबुकवर वारसदार नेमल्याने तुमचे अकाउंट हॅक झाले, तरी त्याची माहिती फेसबुकपर्यंत पोहोचवता येऊ शकते. त्यानंतर फेसबुक वारसदाराला नवा पासवर्ड देऊ शकेल.
हॅकिंग अशाप्रकारे ओळखा –
– ईमेल आयडी आणि पासवर्ड बदलला असेल.
– नाव आणि जन्मतारीख बदलली असेल.
– अशा लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली गेली आहे, ज्यांना तुम्ही ओळखत नाही.
– असे मेसेज पाठवण्यात आले, जे तुम्ही पाठवले नाहीत.
– अशा पोस्ट केल्या गेल्यात, ज्या तुम्ही केल्या नाहीत.
करू नका हे काम –
– अकाउंट लॉगइन करताना पासवर्ड सिक्योर ठेवा. ओपन Wifi चा वापर करू नका.
– फेसबुकवर जन्मतारीख टाकू नका. अनेक जण आपली जन्मतारीखच पासवर्ड ठेवतात. यामुळे हॅकर्स युजर्सचं अकाउंट हॅक करू शकतात.
– मोबाईल नंबर फेसबुकवर टाकू नका. यामुळे युजरच्या सिक्योरिटीला धोका निर्माण होतो. मोबाईल नंबर ठेवला तरी त्यासाठी Only Me सेटिंगचा वापर करा, यामुळे तुमचा मोबाईल नंबर समजणार नाही.
All information collected through the search engines, we are not responsible if anything is not relevant.
