नाशिक मिरर : प्रतिनिधी
मखमलाबाद सार्वजनिक वाचनालयाची 51वी वार्षिक सर्वसाधारण सभा वाचनालयाच्या सभागृहात झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रामदास पिंगळे होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष सुभाष तिडके, कार्यवाह शंकर पिंगळे, नगरसेवक पुंडलीकराव खोडे होते.
मोहन पिंगळे, शंकर पिंगळे, माजी नगरसेवक दामोदर मानकर, कैलास दराडे, निवृत्ती महाले, बाळासाहेब ताजने यांनी वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी मनोगत व्यक्त केली. परिसरातील शांतता व सुरक्षिततेच्यादृष्टीने सीसीटीव्ही बसविण्याबाबत चर्चा करण्यात आली. (कै.) रामचंद्र काकड यांच्या नामकरण सोहळ्याचा मोठा कार्यक्रम करण्यात येणार आहे.
गोकुळ काकड यांनी प्रास्ताविक केले. प्रताप काकड यांनी इतिवृत्त वाचन केले. संदीप धात्रक यांनी वार्षिक कामकाजाचा आढावा घेतला. बाळासाहेब ताजने यांनी वार्षिक जमाखर्च, तर उपाध्यक्ष सुभाष तिडके यांनी अंदाजपत्रक वाचून दाखविले. मागील आर्थिक वर्षाचे जमाखर्च मंजूर करण्यात येऊन नवीन अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली.
देणगी जाहीर
परिसरात नाल्याभोवती संरक्षक भिंत बांधावी, असे निवृत्ती महाले यांनी सुचविले. बाळासाहेब ताजने यांनी नामकरण सोहळ्यास पाच हजार रुपये, तसेच नगरसेवक पुंडलीकराव खोडे यांनी (कै.) भीमराव खोडे यांच्या स्मरणार्थ ११ हजार रूपयांची देणगी जाहीर केली.
कार्यक्रम होतील
अध्यक्ष रामदास पिंगळे म्हणाले, की कोरोना काळातील आपले शिक्षक दिन, कविसंमेलन, कृषीभूषण पुरस्कार असे कार्यक्रम नियमितपणे घेण्यात येतील.
याप्रसंगी कॊरोनाविषयक नियमांचे पालन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. तसेच दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यांची उपस्थिती
सभेस ज्ञानेश्वर पिंगळे, संजय गामने, राका माळी, सुभाष काकड, श्रीकांत दबेरकर, नरेंद्र मुळाणे, माणिक काकड, चिंतामण उगलमुगले, नारायण वाघ, ग्रंथपाल राजेश शिरसाठ,सोनाली पाठक, दशरथ मानकर आदी उपस्थित होते.
अग्रगण्य वाचनालय
जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या या वाचनालयाची स्थापना १९६९ मध्ये झाली आहे. सध्या अ वर्गाचा दर्जा असून, सभासद संख्या ६९६, ग्रंथसंपदा २९ हजार २१९ आहे. वाचनालायचे संस्थापक अध्यक्ष स्व. रामचंद्र काकड (सर) यांना राज्यस्तरीय ग्रंथमित्र पुरस्कार व ग्रंथपाल राजेश शिरसाठ यांना नाशिक विभाग ग्रंथमित्र पुरस्कार प्राप्त मिळालेला आहे.
***
