विटावे चांदवड, ता. ६ : येथील राऊत मळा, विटावे पन्हाळे रोड परिसरात श्री कालिका माता मंदिर बांधण्यात आले व कालिका माता मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व मंदिराचा कलशारोहण सोहळा, विविध कार्यक्रमाच्या आयोजनाने उत्साहात झाला, अशी माहिती श्री. दत्तू पवार यांनी दिली.
विटावे (ता. चांदवड) येथे श्री कालिका माता मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्यानिमित्त मिरवणूक, होमहवन, ह.भ.प. अमोल महाराज राशनकर आळंदी यांचे काल्याचे कीर्तन झाले. तसेच, प.पु . महंत स्वामी जयदेवपुरीजी महाराज चंद्रेश्वर गड चांदवड यांच्या हस्ते ब्राह्ममुहूर्तावर मंदिराचे कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाले. विशेष म्हणजे ह्या मंदिरात ठेवण्यात आलेल्या मूर्ती ला घेऊन शेकडो भाविक देवीच्या मूळ ठिकाणी म्हणजे धार(पवार) मध्यप्रदेश ह्या ठिकाणी गेले होते. विटावे व तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

