दोन दिवसात अपघातात दोन बळी
नाशिक मिरर : वृत्तसेवा
सातपूर औद्योगिक वसाहती मधील सातपूर पोलीस ठाणे हद्दीत दि.१३ रोजी अपघाताच्या दोन मोठ्या घटना घडल्या असून त्यामध्ये आतापर्यंत दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. पहिला अपघात सकाळच्या सुमारास कंपनी मध्ये कामावर जाते वेळी सातपूर औद्योगिक परिसरात झाला असून त्यामध्ये ५३ वर्षीय कामगार जागीच ठार झाला. तर दुसरी घटना रात्री नऊ वाजेच्या सुमारास सातपूर नाशिक रोडवरील रॉयल एनफिल्ड शोरूम समोर वेल्स वॅगन पोलो कंपनीची कार व दोन दुचाकी मध्ये झाला आहे.
या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला असून तीन जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिकहून सातपूरच्या दिशेने जात असलेली फॅशन प्रो मोटरसायकल क्रमांक एमएच १५ डीएफ ३१९० व स्पोर्ट बाईक टू ट्वेंटी एमएच ०३ डीएम ३४५२ जात असतांना सातपूरच्या दिशेने येत असलेली व वळण घेत असलेली वेल्स वॅगन पोलो कार क्रमांक एमएच १५ जीए ०२८० या कारने येणाऱ्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिल्याने स्पोर्ट बाईक वर असलेल्या दोघा जणांपैकी एक मुस्तफा शौकत खान (वय २४ जश पार्क अंबड लिंक रोड) अज्ञात चार चाकी वाहनाने उडवले यात युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे.
तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. तसेच फॅशन प्रो या दुचाकी वरील दोघेजण देखील गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान या अपघातानंतर खेदाची बाब म्हणजेच हा अपघात होऊन सुमारे एक तास उलटून देखील त्या ठिकाणी अंबुलन्स पोहचली नसल्याचे बोलले जात आहे. परंतु अपघाताची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सागर गुंजाळ, घोरपडे, गायकवाड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळली. हा भीषण अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी बघ्यांची देखील मोठी गर्दी जमल्यामुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार हे सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान एकाच दिवशी दुहेरी अपघातात दोन जण जागीच मृत्युमुखी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
